अयोध्या राम मंदिराच्या मुख्य शिखरावर कलश स्थापित
वैदिक मंत्रांच्या जपात हवनपूजा : श्रीराम नगरीत जयघोष : कलश प्रतिष्ठापनेने राम मंदिराचे शिखर चमकले
वृत्तसंस्था/ अयोध्या
अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिराच्या बांधकामाने सोमवारी आणखी एक ऐतिहासिक टप्पा ओलांडला. ब्राह्मणांच्या उपस्थितीत वैदिक विधीनुसार रामनगरी अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिराच्या गर्भगृहाच्या मुख्य शिखरावर सोमवारी शुभप्रसंगी कलश स्थापित करण्यात आला. वैदिक आचार्यांनी विधीनुसार मंत्रोच्चार करून 161 फूट उंचीवर कलशाची पूजा केली. यासोबतच जन्मभूमी संकुलात बांधलेल्या मंदिरांमध्ये शब्द ऋषींची स्थापना देखील पूर्ण झाली. नजिकच्या काळात अवतीभोवती बांधल्या जाणाऱ्या सहा मंदिरांवरही कलश बसवला जाईल. सध्या या मंदिराचे रात्रं-दिवस बांधकाम सुरू आहे.
श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी शिखरावर बसविण्यात आलेल्या कलशासंबंधीची माहिती दिली. वैशाखीच्या महत्त्वाच्या तारखेला आणि डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीदिनी श्रीराम जन्मभूमीच्या भव्य मंदिराच्या गर्भगृहाच्या कलशाचे काम पूर्ण झाले. सोमवारी सकाळी 9.15 वाजता कलश प्रतिष्ठापनेचे काम पूर्ण विधी आणि पूजेसह सुरू झाले आणि सकाळी 10.30 वाजता ते पूर्ण झाले, असे राय यांनी स्पष्ट केले. अयोध्येत भगवान श्रीराम यांच्या भव्य मंदिराचे बांधकाम हे देशवासियांच्या श्रद्धेचे आणि दृढ निश्चयाचा परिणाम आहे. या मंदिरामुळे जागतिक स्तरावर भारताची शाश्वत संस्कृती आणखी बळकट होईल, असेही चंपत राय म्हणाले.
मंदिराचे बांधकाम प्रगतीपथावर
कलश स्थापनेवेळी अयोध्येत उत्सवाचे वातावरण होते. स्थानिक लोकांनी याला ऐतिहासिक क्षण असे म्हटले आहे. राम मंदिराच्या बांधकामामुळे आणि अयोध्येच्या कायापालटामुळे, केवळ उत्तर प्रदेशातच नव्हे तर संपूर्ण देशात रामभक्तीची लाट तीव्र होत आहे. आता मंदिराच्या मुख्य शिखरावर ध्वजस्तंभ बसवण्याची प्रक्रिया सुरू होईल. मंदिराचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. आता मंदिर परिसरातून बांधकाम यंत्रे काढून टाकली जातील, अशी माहिती चंपत राय यांनी दिली. पहिल्या मजल्यावरील राजा राम, परकोटा आणि सप्तर्षींच्या मंदिरांमध्ये मूर्ती बसवण्याचे कामही लवकरच सुरू होईल. मंदिराचे बांधकाम पूर्वनियोजनानुसार सुरू असल्याने भाविकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही आनंद व्यक्त केला आहे.
भाविकांसाठी सुविधांचा विस्तार : मुख्यमंत्री
राम मंदिराचे बांधकाम हे केवळ आध्यात्मिकच नाही तर सांस्कृतिक आणि सामाजिक एकतेचे प्रतीक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्रस्टसोबतच आणि मंदिर निर्मितीत सहभागी असलेल्या सर्वांचे कौतुक करत ‘नवभारता’च्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे म्हटले. अयोध्या हे जागतिक दर्जाचे धार्मिक स्थळ बनविण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. रस्ते, रेल्वे आणि हवाई संपर्काबरोबरच पर्यटक आणि भाविकांसाठी सुविधांचा विस्तार केला जात असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
22 जानेवारी 2024 रोजी भगवान रामलल्ला यांचा भव्य राजवाडा तयार झाला. मंदिराचे बांधकाम चालू असतानाच शुभ मुहूर्तावर भगवान रामलल्ला त्यांच्या जन्मस्थळी बांधलेल्या भव्य मंदिरात विराजमान झाले होते. मंदिराचे बांधकाम अजूनही सुरू असून ते डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.