Kalammawadi Dam : धरणातून 20 हजार क्युसेकचा पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरु
रस्त्यांवर पाणी आल्याने वहातुकीचे मार्ग बंद झाले आहेत
सरवडे : राधानगरी तालुक्यातील काळम्मावाडी येथील दूधगंगा (राजर्षी शाहू सागर) धरण परिक्षेत्रात अतिवृष्टी सुरु असल्याने धरणातील पाणीसाठा नियंत्रणात आणण्यासाठी जलविद्युत केंद्रातून १५०० क्युसेक तर धरणाच्या सांडव्या वरून १८,५०० क्युसेकचा असा एकुण २०,००० क्युसेक पाण्याचा विसर्ग दूधगंगा नदीपात्रात सुरू आहे. पाण्याच्या विसर्गात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने दूधगंगा नदी पात्राबाहेर गेली आहे. अनेक रस्त्यांवर पाणी आले असून पिके व बंधारे पाण्याखाली गेल्याने वहातुकीचे मार्ग बंद झाले आहेत.
मागील चार दिवस काळम्मावाडी धरण परिक्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक वाढली आहे. परिणामतः धरण सुरक्षेच्या दृष्टीने धरणातील पाण्याची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी आज मंगळवारी धरणातील २०,००० क्युसेकने पाण्याचा विसर्ग दुधगंगा नदीपात्रात करण्यात आला.
पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याने दूधगंगा नदी पात्राबाहेर गेली. परिणामी कासारपुतळे, सावर्डे पाटणकर येथे रस्त्यावर पाणी आल्याने तसेच तुरंबे, सुळंबी जुना बंधारा पाण्याखाली गेला आहे. सरवडे येथील दत मंदिराला पाण्याचा वेढा पडला आहे. पाण्याचा विसर्ग वाढल्याने दुधगंगा नदी काठावर धोकादायक स्थिती निर्माण झाली. नदीकाठावर राहणाऱ्या नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.