थेटपाईपलाईनचा वीजपुरवठा रामभरोसे! झाडे कोसळून वीज पुरवठा खंडीत होऊन वारंवार पाणीपुरवठा बंद
27 किलोमीटरवरून विद्युतलाईन आणणे रिस्कीच : थेटपाईपलाईननंतरही पाण्याचा प्रश्न कायम, जुनी योजना बरी म्हणण्याची वेळ
विनोद सावंत कोल्हापूर
काळम्मावाडी थेटपाईपलाईन योजनेच्या धरण क्षेत्रातील उपसा केंद्रातील वीजपुरवठा रामभरोसे झाला आहे. उपसा केंद्रापासून 27 किलोमीटरवर असलेल्या बिद्रीतून आणलेली विद्युतलाईन वादळी वाऱ्यामुळे वारंवार तुटत असल्याने उपसा केंद्र बंद राहत आहे. परिणामी शहरातील पाणीपुरवठा खंडीत होत आहे. यामुळे शुद्ध आणि मुबलक पाणी देण्याच्या थेटपाईपलाईन योजनेच्या मुळ उद्देशाला हारताळ फासली जात आहे.
थेटपाईपलाईनचे पाणी 10 नोव्हेंबर 2023 रोजी पुईखडी येथील जलशुद्धीकरण केंद्रात आले. यावेळी शहरातील पाण्याचा प्रश्न कायमचा मिटला जाईल, असा दावा करण्यात आला. योजना पूर्ण होऊन सहा महिने झाले तरी पाण्याचा प्रश्न काही मिटलेला नाही. उलट वारंवार पाणीपुरवठा बंद पडत आहे. यामध्ये सर्वाधिक थेटपाईपलाईनचा वीजपुरवठा खंडीत होऊन पाणी पुरवठा बंद झाला आहे. यामुळे 27 किलोमीटर वरून विद्युतलाईन आणण्याचा निर्णयावरच प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.
27 किलोमीटर विद्युतलाईनचा प्रवास खडतरच
बिद्री ते जॅकवेल आणलेली विद्युतलाईन झाडे कोसळून तुटण्याच्या घटना वाढल्या आहेत. दोन वेळा तर माकडांमुळे विद्युतलाईन शॉर्ट होऊन वीजपुरवठा बंद झाला. यामुळे शहरातील पाणीपुरवठा बंद पडत आहे. त्यामुळे 27 किलोमीटरवरून आणलेली विद्युतलाईन रिस्की ठरत आहे. यामुळे जुनी योजनाच बरी म्हणण्याची वेळ शहरवासियांवर आली.
पर्याय नसल्यानेच बिद्रीतून आणली विद्युतलाईन
काळम्मावाडी धरणाच्या पॉवर जनरेटमधून वीज घेण्याचा पर्याय होता. परंतू 12 महिने येथे आवश्यक असणारी वीज मिळत नाही. राधानगरी, सोळांकुर येथूनही विद्युतलाईन आणता आली असती. परंतू शासकीय परवानगी घेणे, झाडे तोडण्यामध्ये बराच कालावधी गेला असता.
27 किलोमीटरवरून विद्युतलाईन, 55 किलोमीटर पाईपलाईन
कधी पाईपलाईन गळती, व्हॉल्वमध्ये बिघाड तर कधी विद्युतलाईन तुटणे. यामुळे थेटपाईपलाईनचा पाणीपुरवठा बंद पडत आहे. यामुळे नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहे. जंगल क्षेत्र असणाऱ्या 27 किलोमीटरवरून विद्युतलाईन आणणे, 55 किलोमीटर अंतरावरून पाईपलाईनने आणल्याचे महागात पडत आहे.
खर्चिक असल्यानेच भूमिगतला नकार
जंगल क्षेत्र असल्याने वास्तविक थेटपाईपलाईनसाठी भूमिगत विद्युतलाईन आणणे आवश्यक होते. परंतु 27 किलोमीटरवरून भूमिगत विद्युतलाईन आणण्यासाठी कोट्यावधींचा खर्च झाला असता. 4 किलोमीटर सोडले तर 23 किलोमीटर विद्युतलाईन खांबावरून आणली.परंतू वारंवार वायर तुटण्याच्या घटना घडत आहेत.
काळम्मवाडीला हळदी किंवा बलिंगा ठरला असता चांगला पर्याय
थेटपाईपलाईन योजनेसाठी 488 कोटींचा निधी खर्च झाला आहे. यामध्ये 55 किलोमीटर पिण्याची पाईपलाईन तर 27 किलोमीटर विद्युतलाईन आणली आहे. काही तज्ञाकडून काळम्मावाडी धरणाऐवज 5 ते 10 किलोमीटर अंतरावरील हळदी किंवा बालिंगा येतील नदीतून पाणी आणणे योग्य ठरले असते. शिवाय 100 कोटीच्या खर्चात हे भागले असेत, असे म्हटले जात आहे.
5 वर्षानंतर खरी परिक्षा
पाच वर्ष योजनेची देखभाल, दुरूस्तीची जबाबदारी ठेकेदाराची आहे. ठेकेदाराकडे तज्ञ कर्मचारी, तंत्रज्ञ आहे. पाच वर्षानंतर मनपाला ही योजना चालवावी लागणार असून यानंतर खरी परिक्षा असणार आहे.
पुढील वर्षी पावसाच्या अगोदर झाडांची छाटणी
थेटपाईपलाईनला 24 तास वीज मिळावी म्हणूनच सर्व पर्यायांचा अभ्यास करून अंतिमत: बिद्रीतून विद्युतलाईन आणली आहे. वादळी वाऱ्यामुळे थेटपाईपलाईनची विद्युतलाईन तुटू नये यासाठी पुढील वर्षी एप्रिल ते मे दरम्यान, संबंधित विभागाच्या परवानगीने विद्युतलाईनच्या मार्गावरील झाडांची छाटणी केली जाईल.
हर्षजित घाटगे, जल अभियंता महापालिका