‘एक गाव एक गणपती’ राबवणारे काळम्मा बेलेवाडी
सेनापती कापशी / सदाशिव आंबोशे :
कागल तालुक्यातील काळम्मा बेलेवाडी गावात गटातटात प्रचंड राजकारण असताना देखील येथे ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना राबवत गावाचा एकोपा ग्रामस्थांनी टिकवला. निवडणुकीपुरते राजकारण आणि इतर वेळी समाजकारण करत गावाने वेगळेपण जपले आहे. या गावात 2006 मध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना येथील पहिले लोकनियुक्त सरपंच कै. सागर पाटील यांनी केली.
तालुक्यातील दक्षिणेकडील शेवटचं गाव म्हणजे काळम्मा बेलेवाडी. येथील काळम्मादेवीच्या नावावरून या बेलेवाडीला ‘काळम्मा बेलेवाडी’ नाव पडले आहे. चिकोत्रा धरण बेलेवाडी गावाजवळच होणार होते. मात्र अनेक गावे विस्थापित होणार होती. येथे अडवणाऱ्या पाण्याचा लाभ महाराष्ट्राऐवजी कर्नाटकालाच जादा होणार होता. म्हणून डाव्या चळवळीतील, सामाजिक कार्यकर्त्यांनी हा प्रकल्प येथे होऊ दिला नाही. अनेक वर्षे लढा दिल्यानंतर हा चिकोत्रा प्रकल्प येथे न होता, तो झुलपेवाडीकडे गेला, त्यानंतर अनेक वर्ष गावाकडे विकासाच्यादृष्टीने या प्रकल्पाच्या चर्चेने दुर्लक्ष झाले.
या लढवय्या गावात सामाजिक कार्यकर्ते, पहिले लोकनियुक्त सरपंच सागर पाटील यांनी गावाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी 2006 मध्ये सदा हसन कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ अंतर्गत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्थापन केले. विशेष म्हणजे प्रचंड ईर्षा आणि गटातटाचे राजकारण असणाऱ्या या गावात त्यावेळेपासून आजपर्यंत येथे ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना राबवली जात आहे. दुर्दैवाने कोरोना काळात सागर पाटील यांच्यासारखा कार्यकर्ता काळाच्या पडद्याआड गेला. मात्र त्यांनी केलेले काम आजही बेलेवाडीकरांच्या स्मरणात आहे. त्यांचे अपूर्ण कार्य मंडळाचे सर्व कार्यकर्ते मनापासून करत आहेत.
दरवर्षी मंडळामार्फत गणेशोत्सवामध्ये विविध स्पर्धा आयोजिल्या जातात. सामाजिक उपक्रम म्हणून रक्तदान, आरोग्य, नेत्रचिकित्सा शिबिर घेतले जाते. गावात गेली 19 वर्षे ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना यशस्वीपणे राबवून तालुक्यात आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे 2024 मधील मुरगुड पोलीस ठाण्याकडून दिला जाणारा मानाचा गणराया अॅवॉर्ड मंडळाला मिळाला आहे. मुरगुड पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मंडळाने सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. यावर्षीची गणेश मूर्ती मंडळाचे अध्यक्ष सागर शिवाजी पाटील (वायडी) यांनी अर्पण केली आहे. मंडळाने यावर्षी रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या शिबिराला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत 52 जणांनी रक्तदान केले आहे.
या शिबिराच्या निमित्ताने मंडळाचे संस्थापक कै. सागर पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन उपसरपंच बाळासाहेब सुतार यांच्या हस्ते करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष सागर पाटील (वायडी), उपाध्यक्ष विठ्ठल पाटील, खजिनदार रमेश पाटील, सचिव हरीश पाटील, सुनील पाटील, विनोद मुदाळकर, संजय पाटील, बाजीराव पाटील, दिवाकर पाटील, दशरथ पाटील, मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी यावर्षीचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्याचे नियोजन केले आहे.
- मंत्री मुश्रीफ यांनी गाव घेतले दत्तक
बेलेवाडी काळम्मा गावच्या हद्दीत सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना झाल्याने वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी गाव दत्तक घेतले आहे. गावच्या विकासाची संपूर्ण जबाबदारीही त्यांनीच घेतली आहे. त्यामुळे गावातील अंतर्गत रस्ते, गटारी, पिण्याच्या पाण्याची योजना, इतर विकासकामेही त्यांच्या माध्यमातून झाली आहेत. ग्रामदैवताचे बांधकामही पूर्णत्वाकडे आले आहे. त्यासाठी प्रचंड निधी मंत्री मुश्रीफ यांनी दिला आहे.
गावचे पहिले लोकनियुक्त सरपंच कै. सागर पाटील यांनी या मंडळाची स्थापना केली. ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना गावात त्यांनी राबवली. आज ते आमच्यामध्ये नाहीत. परंतु त्यांची सतत उणीव भासते. मंडळाच्यावतीने गेली 19 वर्षे ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना गावामध्ये रुजली आहे. मंडळाच्यावतीने दरवर्षी विविध उपक्रम राबवले जातात. दरवर्षी नवीन एक उपक्रम हाती घेतला जातो. यातून गावाची एकी दिसून येते. निवडणुकीपुरते राजकारण इतर वेळी सर्व एकत्र येऊन काम करतात.
-सागर शिवाजी पाटील, अध्यक्ष सदा हसन कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ अंतर्गत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ बेलेवाडी काळम्मा