Kolhapur News : कळंबाची सुदीक्षा राज्यस्तरावर चमकली; तेलंगाना स्पर्धेसाठी निवड
कोल्हापूरची सुदीक्षा देसाई महाराष्ट्र क्रिकेट संघात
कळंबा : कोल्हापूरच्या क्रीडा परंपरेत आणखी एक अभिमानाची भर घालत सुदीक्षा देसाई हिने राज्यस्तरावर चमकदार कामगिरी करत आपली छाप पाडली आहे. आगामी काळात तेलंगाना येथे होणाऱ्या १७ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात तिची निवड झाली आहे.
उत्कृष्ट तंत्र, परफेक्ट टाइमिंग आणि संयमी खेळ या गुणांच्या जोरावर सुदीक्षाने गेल्या काही महिन्यांत अनेक स्थानिक आणि जिल्हास्तरीय सामन्यांमध्ये प्रभावी कामगिरी केली. तिच्या खेळातील सातत्य व चिकाटी यामुळेच निवड समितीचे लक्ष तिच्याकडे वेधलेगेले. सुदीक्षा ही सेंच्युरियन क्रिकेट अकॅडमी, कळंबा येथे सराव करत असून प्रशिक्षक अमित साळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली तिने बॅटिंग आणि फिटनेसवर विशेष मेहनत घेतली आहे.
तिच्या मेहनतीचे फळ तिला राज्य संघातील स्थानाच्या रूपाने मिळाले. क्रिकेटमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगलेल्या सुदीक्षाच्या या यशामुळे कोल्हापूरच्या महिला क्रिकेटला नवी ऊर्जा मिळाली आहे. आगामी राज्यस्तरीय स्पर्धेत ती महाराष्ट्रासाठी चांगली कामगिरी बजावेल ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.