Kalamba Lake Overflow 2025: ऐतिहासिक कळंबा तलाव ‘ओव्हरफ्लो’, पर्यटकांची गर्दी वाढणार
बुधवारी पहाटे २७ फुटांवर पोहोचल्याने सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला
By : सागर पाटील
कळंबा : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून मुसळधार पावसाने जोर धरला असून, शहरालगतचा ऐतिहासिक कळंबा तलाव बुधवारी पहाटे पूर्ण क्षमतेने भरून ‘ओव्हरफ्लो’ झाला. यंदा जूनमध्येच तलाव सांडव्यावरून वाहू लागल्याने कळंबा गाव आणि कोल्हापूर शहरात आनंदाचे वातावरण आहे. तलावाच्या निसर्गरम्य सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक, ग्रामस्थ आणि फोटोग्राफर्सची मोठी गर्दी उसळली आहे.
जलस्रोताची समृद्धी
कळंबा तलाव अनेक दशकांपासून कळंबा गाव आणि कोल्हापूर शहरासाठी महत्त्वाचा जलस्रोत आहे. मागील वर्षी २३ जुलै रोजी तलाव पहिल्यांदा ओसंडून वाहिला होता. यंदा मात्र जूनमध्येच पाणीपातळी झपाट्याने वाढली, ज्यामुळे निसर्गाने लवकरच जलसमृद्धीचा आशीर्वाद दिल्याचे दिसते. एप्रिल-मे महिन्यात तलावाची पाणीपातळी ११ फुटांपर्यंत खालावली होती.
कोल्हापूर महापालिका आणि कळंबा ग्रामपंचायतीद्वारे बेसुमार पाणीउपशामुळे तलावाचे पश्चिम पात्र कोरडे पडले होते. पावसाचा मागमूस नसल्याने चिंता वाढली होती. मात्र, जूनच्या पहिल्या आठवड्यापासून दमदार पावसाने सर्वांना दिलासा दिला. मंगळवारी पाणीपातळी २६ फुटांवर होती बुधवारी पहाटे २७ फुटांवर पोहोचल्याने सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला.
निसर्गसौंदर्याचा आविष्कार
सांडव्यातून कोसळणाऱ्या पाण्याने पांढरे शुभ्र धबधबे निर्माण झाले असून, हिरवळ आणि ढगाळ वातावरणाने तलावाभोवती मनोहारी दृश्य अवतरले आहे. पर्यटक, स्थानिक आणि फोटोग्राफर्सना या सौंदर्याने भुरळ घातली आहे. अनेकांनी सेल्फी, फोटोशूट आणि व्हिडीओ काढत निसर्गाचा आनंद लुटला. सोशल मीडियावर तलावाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
भावनिक आणि व्यावहारिक महत्त्व
कळंबा तलाव केवळ पाण्याचा साठा नव्हे, तर स्थानिकांचे भावनिक केंद्र आहे. कात्यायनी टेकडी आणि सात नैसर्गिक ओढ्यांतून येणारे पाणी मोठ्या प्रमाणात आहे. यंदा ओढे दुतोंडी भरून वाहिल्याने तलाव जून महिन्यातच ‘ओव्हरफ्लो’ झाला. याचा फायदा कळंबा गावासह कोल्हापूर शहराला होणार आहे.
पर्यटन आणि अर्थव्यवस्थेला चालना
तलावाच्या काठावरून कोसळणारे पाणी, हिरवीगार झाडी आणि ढगाळ आकाश यामुळे कळंबा परिसराने नवे रूप धारण केले आहे. येत्या शनिवार-रविवारी पर्यटकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. पर्यटकांनी सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन कळंबा ग्रामपंचायतीने केले आहे.
पाणीपुरवठ्याला दिलासा
तलाव ‘ओव्हरफ्लो’ झाल्याने कळंबा गावासह कोल्हापूर महापालिकेला मोठा दिलासा मिळाला. सध्या शहरातील काही भागांत पाणीपुरवठा विस्कळीत आहे. आता पुरेसा पाणीसाठा उपलब्ध झाल्याने पाणीटंचाईची चिंता कमी झाली असून, लवकरच पाणीपुरवठा नियमित होण्याची आशा आहे.
कळंबा तलावाचे ‘ओव्हरफ्लो’ होणे ही निसर्गाची अनमोल देणगी आहे. यामुळे पाणीसाठा, पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ मिळेल. या निसर्गसौंदर्याचा आनंद लुटताना सर्वांनी सुरक्षिततेची काळजी घ्यावी.तसेच कळंबा तलावाच्या या वैभवाने कळंबा ग्रामस्थांनसह कोल्हापूरकरांचा उत्साह द्विगुणित झाला आहे.