For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur News: कळंबा तलाव सांडव्याजवळील पुलाची दुरावस्था, स्ट्रक्चरल ऑडिटची गरज

06:07 PM Sep 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
kolhapur news  कळंबा तलाव सांडव्याजवळील पुलाची दुरावस्था  स्ट्रक्चरल ऑडिटची गरज
Advertisement

हा पूल कळंबा ते पाचगावला जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे

Advertisement

By : सागर पाटील

कळंबा : कळंबा तलाव येथील सांडवा परिसरात असलेल्या ऐतिहासिक शाहूकालीन कळंबा तलावाच्या सांडव्यानजीक सुमारे 25 वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने उभारलेला पूल आज दुरवस्थेच्या उंबरठ्यावर उभा आहे. हा पूल कळंबा ते पाचगावला जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे.

Advertisement

येथूनच कळंबा पासून आर. के. नगर, चित्रनगरी आणि गिरगाव मार्गाकडे जाणारी वाहतूक नियमित सुरू असते. मात्र, या पुलाची झालेली जीर्ण अवस्था आणि कमकुवतपणा यामुळे नागरिकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कळंबा ग्रामस्थ आणि प्रवाशांनी या पुलाच्या तत्काळ स्ट्रक्चरल ऑडिट आणि मजबुतीकरणाची मागणी लावून धरली आहे.

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे भविष्यात अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या 40 फूट लांबीच्या पुलाचे खांब उघडे पडले असून, त्यांचा बहुतांश भराव पाण्याच्या जोरदार प्रवाहाने वाहून गेला आहे. पुलावरील संरक्षक कठडेही कमकुवत झाले असून, ते केव्हाही कोसळण्याच्या मार्गावर आहेत.

पावसाळ्यात तलाव ओव्हरफ्लो होताच सांडव्यातून पाण्याचा प्रचंड वेगाने विसर्ग होतो, ज्यामुळे पुलाच्या संरचनेवर मोठा दबाव येतो. अनेकदा पूल कंप पावत असल्याचा अनुभव वाहनधारकांना येतो. या मार्गावर अवजड वाहने, दुचाकी आणि पादचारी यांची नियमित वर्दळ असते. कळंबा, पाचगाव, आर. के. नगर आणि चित्रनगरी परिसरातील रहिवासी आणि पर्यटक यांच्यासाठी हा पूल महत्त्वाचा आहे. मात्र, त्याची सध्याची अवस्था पाहता, अपघाताची शक्यता वाढली आहे.

पुलाच्या दुरवस्थेची कारणे या पुलाचे बांधकाम 2000 च्या सुरुवातीला झाले होते. त्यानंतर गेल्या 25 वर्षांत नियमित देखभाल किंवा स्ट्रक्चरल ऑडिट झालेले नाही. पाण्याच्या सततच्या प्रवाहामुळे खांबांचा पाया कमकुवत झाला आहे. संरक्षक कठड्यांचे नुकसान झाले असून, त्यांची ताकद जवळपास संपुष्टात आली आहे. तत्काळ स्ट्रक्चरल ऑडिट आणि मजबुतीकरण न झाल्यास, पूल कोसळण्याचा धोका संभवतो आहे.

अतिवृष्टीचा परिणाम :

"2025 च्या पावसाळ्यात कोल्हापूर जिह्यात मुसळधार पावसाने कळंबा तलाव जूनमध्येच ओव्हरफ्लो झाला. यामुळे सांडव्यातून पाण्याचा वेगवान प्रवाह वाढला, ज्याने पुलाच्या संरचनेवर दबाव वाढला. पुलाच्या मजबुतीकरणाविषयी संबंधित प्रशासनास तत्काळ कारवाई करण्याबाबतीत कळवले होते. प्रशासनाने वेळेत ठोस उपाययोजना न केल्यास भविष्यात गंभीर परिणाम भोगावे लागतील."

- सुमन गुरव, सरपंच, कळंबा

"पुलाची अवस्था इतकी खराब आहे की, पावसाळ्यात पूल पार करताना जीव मुठीत धरावा लागतो. प्रशासनाने त्वरित स्ट्रक्चरल ऑडिट करून दुरुस्ती करावी, अन्यथा मोठी दुर्घटना अटळ आहे."

- सागर भोगम, माजी सरपंच, कळंबा

Advertisement
Tags :

.