Kolhapur News : कळंबा ग्रामपंचायतीचा घनकचरा प्रकल्पाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक
ग्रामीण भागातील आदर्श कचरा व्यवस्थापनाचे मॉडेल कळंबा
by सागर पाटील
कळंबा : ग्रामीण भागातील कचरा व्यवस्थापनाचा आदर्श नमुना ठरत कळंबा ग्रामपंचायतीने उभारलेला अत्याधुनिक घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही कौतुकास पात्र ठरला आहे. अवनी संस्थेच्या माध्यमातून अमेरिकेतील डेनवर विद्यापीठातील एम.एस.डब्ल्यू. अभ्यासक्रमाचे नऊ विद्यार्थी आणि दोन प्राध्यापकांनी गुरुवारी या कळंबा कचरा प्रकल्पाला विशेष भेट देत त्याची सविस्तर पाहणी केली.
ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून साकारलेल्या या प्रकल्पामुळे स्थानिक सहा महिलांना कायमस्वरूपी रोजगार मिळून त्यांच्या कुटुंबाला स्थिर आर्थिक आधार प्राप्त झाला आहे. दररोज सुमारे ५०० किलो कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. ओला व सुका कचरा काटेकोरपणे वेगळा करून ओल्या कचऱ्यापासून तयार होणारे उच्च प्रतीचे सेंद्रिय खत हे या प्रकल्पाचे वैशिष्ट्य मानले जाते.
तयार होणारे जवळपास २०० किलो खत स्थानिक शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध होणार असून शेतीखर्चात मोठी बचत होणार आहे. या प्रकल्पाची आणखी एक महत्त्वाची बाजू म्हणजे ‘ई-कचरा’ आणि प्लास्टिकपासून ऊर्जा व पुनर्वापरयोग्य वस्तू निर्मितीची सुरू असलेली योजना. क्रशिंग प्रक्रियेद्वारे या अविघटनशील कचऱ्यापासून ऑईल तसेच अन्य उपयुक्त वस्तू तयार करण्याचा अभिनव प्रयोग येथे सुरू आहे. त्यामुळे कचऱ्याचा एकही कण वाया न जात ‘टाकाऊतून टिकाऊ’ या संकल्पनेची प्रेरक अंमलबजावणी प्रत्यक्षात दिसून येत आहे.
कळंबा तलावाचे आरोग्य सुधारण्यासही या प्रकल्पाचा थेट लाभ होणार आहे. कचरा डेपोमुळे होणारे जलप्रदूषण आटोक्यात येत असल्याने तलावाचे प्रदूषण कमी होईल आणि परिसरातील पर्यावरणीय गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल. अनेक वर्षे ग्रामस्थांना भेडसावणारा कचरा संकलनाचा प्रश्न या प्रकल्पामुळे कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे. अमेरिकन विद्यार्थ्यांनी कळंबा ग्रामपंचायत कार्यालयालाही भेट देत गावातील समस्यांची माहिती घेतली.
या वेळी अवनी संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील, किर्लोस्कर ऑइल कंपनीचे शरद आजगेकर, सरपंच सौ. सुमन विश्वास गुरव, उपसरपंच दिपाली योगेश रोपळकर, ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी ग्रामविकास अधिकारी विलास राबाडे आदी उपस्थित होते. कळंबा ग्रामपंचायतीचा हा प्रकल्प ग्रामीण विकासाचे एक अनुकरणीय मॉडेल ठरत आहे.