Gas Blast Kolhapur: कळंबा गॅस स्फोटातील जखमी चिमुकल्याचा मृत्यू, मृतांचा आकडा तीनवर
या गॅस स्फोटाच्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आता तीनवर पोहोचला आहे
कोल्हापूर : कळंबा गॅस स्फोटात जखमी झालेला प्रज्वल अमर भोजणे (वय 6) हा चिमुकला गेल्या पंधरा दिवसांपासून मृत्युशी झुंज देत होता. त्यांच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यना त्यांचा बुधवारी दुपारी मृत्यू झाला. या गॅस स्फोटाच्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आता तीनवर पोहोचला आहे.
या प्रकरणी गॅस पुरवठा करणाऱ्या कंपनीच्या संबंधित कर्मचाऱ्याविरोधी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया बुधवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. कळंबा येथील मनोरमा कॉलनीत राहणाऱ्या भोजणे कुटुंबात गणपती आगमनाची तयारी सुरू होती. घरातील स्वच्छता, सुरू असतानाच 25 ऑगस्ट रोजी घरी जोडलेली पाईप गॅस पाईप लिकेज होऊन घरात गॅस गळती होवून गॅस स्फोट झाला होता.
यामध्ये चौघेजण भाजून गंभीर जखमी झाले होते. या दुर्घटनेत सून शितल अमर भोसले (वय २९) यांचा दुर्घटनेच्या दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला. त्यानंतर सीपीआर रुग्णालयात उपचार घेणारे अंनत भोजने (वय ६०) यांचा चार ते पाच दिवसानंतर मृत्यू झाला. तर प्रज्वल अमर भोजने (वय ६) यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु होते.
त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्याला पुढील उपचारासाठी शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तो गेल्या पंधरा दिवसापासून मृत्युशी झुंज देत होता. या चिमुकल्या प्रज्वलला वाचवण्यासाठी त्या खासगी रुग्णालयाच्या डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरु होते. अखेर बुधवारी (दि. भोजने १०) दुपारी त्याचा मृत्यू झाला.
गॅस जोडणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या एका चुकीमुळे कुटुंबातील तीन सदस्यांना जीव गमवावा लागल्याने, संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. जुना राजवाडा पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे.
अहवाल पोलिसांकडे
गॅस दुर्घटनेतील फॉ रेन्सिक तज्ज्ञांचा प्राथमिक तपासाचा अहवाल जुना राजवाडा पोलिसांना मिळाला आहे. त्यामध्ये गॅस पुरवठा करणाऱ्या कंपनीच्या संबंधित कर्मचाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस सुत्रांच्याकडून समजली