कालमणी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचे आर्थिक मदतीसाठी मंत्र्यांना निवेदन
प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव 2025 मध्ये करण्याचा निर्णय : विविध विकासकामे हाती
वार्ताहर/कणकुंबी
कालमणी येथील प्राथमिक मराठी शाळेचा अमृतमहोत्सव 2025 मध्ये आयोजित करण्याचा निर्णय शाळेच्या माजी विद्यार्थी संघटनेने घेतलेला असून त्यासाठी माजी विद्यार्थी संघाने शाळेच्या आवारात विविध विकासकामे हाती घेतली आहेत. सदर विकासकामांच्या निधीसाठी पालकमंत्री सतीश जारकीहोळी व महिला आणि बाल कल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना आर्थिक मदतीचे निवेदन नुकतेच देण्यात आले. स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे सन 1947 मध्ये कालमणी गावात शाळा सुरू केली. कोरोना महामारीमुळे शाळेचा अमृतमहोत्सव साजरा करता आला नाही, म्हणून कालमणी शाळेच्या माजी विद्यार्थी संघाने 2025 मध्ये शाळेचा अमृतमहोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. सध्या शाळा आवारात विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. या विकास कामांसाठी आर्थिक मदत मिळवण्यासाठी आमदार, खासदार व मंत्र्यांना निवेदने देऊन शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी माजी विद्यार्थी कंबर कसून कामाला लागले आहेत.
शाळा आवारात सुशोभीकरण, बाग बगीच्या, स्टेज, विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी विविध शैक्षणिक साहित्य तसेच मैदानाचे सपाटीकरण व सर्व खोल्यांना नवीन दरवाजे, खिडक्या, फरशी व इतर विविध विकासकामे राबविण्यात येत आहेत. यासाठी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष अनिल कालमणकर, सत्यदेव नाईक, मिलिंद नाईक, सिद्धाप्पा भरणकर, तानाजी बळजी, कृष्णा भरणकर, हरीश नाईक, अनंत मादर यांनी नुकतीच पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची तसेच मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. सद्यस्थितीत मातृभाषेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे. मातृभाषेच्या शाळांमध्ये आधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कालमणी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी आर्थिक निधी जमा करून शैक्षणिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. अनिल कालमणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सदस्यांनी अनेक दानशूर व्यक्तींकडून तसेच शिक्षणप्रेमी नागरिकांकडून मदत मिळवत असल्याने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.