For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सिद्धरामय्या-कुमारस्वामींमध्ये कलगीतुरा

06:45 AM Aug 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
सिद्धरामय्या कुमारस्वामींमध्ये कलगीतुरा
Advertisement

अटकेच्या मुद्द्यावरून आव्हान-प्रतिआव्हान

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

मुडाच्या भूखंड वाटप प्रकरणी सिद्धरामय्यांविरुद्ध खटला चालविण्यास राज्यपालांनी परवानगी दिल्यानंतर आता केंद्रीयमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्याविरुद्ध खटला चालविण्यास परवानगी देण्याची मागणी लोकायुक्तच्या एसआयटीने केली आहे. आता या मुद्द्यावरून सिद्धरामय्या आणि कुमारस्वामी यांच्यात कलगीतुरा सुरू झाला आहे. कुमारस्वामी यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतल्यानंतर सिद्धरामय्या यांनी परिस्थिती उद्भवली तर कुमारस्वामींना अटक केली जाईल, असे म्हटले आहे. तर कुमारस्वामींनी प्रत्युत्तर देताना अटक करणे अशक्य असल्याचे म्हटले आहे.

Advertisement

बेकायदा खाणकामासाठी जमीन मंजूर केल्याप्रकरणी केंद्रीयमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांना अटक करण्याची परिस्थिती निर्माण झालेली नाही. मात्र, तशी परिस्थिती उद्भवल्यास न डगमगता त्यांना अटक केली जाईल, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे. बुधवारी आलमट्टी जलाशयाच्या गंगापूजनापूर्वी पत्रकारांशी बोलताना सिद्धरामय्या यांनी बेकायदा खाणप्रकरणी कुमारस्वामी यांच्यावर टीका केली. या प्रकरणासंबंधी राज्यपालांकडून तपासाला परवानगी मिळू शकेल, अशी भीती कुमारस्वामींना सतावत आहे. त्यांच्याविरुद्ध लोकायुक्त एसआयटीने तपास अहवाल सादर करून खटल्याला परवानगी मागितली होती. राज्यपालांकडून उत्तर न मिळाल्याने एसआयटीने पुन्हा एकदा अर्ज सादर केला आहे, असे ते म्हणाले.

माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या बाबतीत राज्यपाल विलंब करत आहेत. माझ्या बाबतीत त्यांनी तपास अहवालाचा विचार न करता खटल्याला परवानगी दिली आहे. हा भेदभाव नव्हे का?, असा सवालही सिद्धरामय्या यांनी उपस्थित केला आहे.

सिद्धरामय्यांसारखे शंभर जण आले तरी अटक अशक्य!

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कुमारस्वामी यांच्यावरील कारवाईविषयी केलेल्या वक्तव्यावर कुमारस्वामींनी परखडपणे प्रतिक्रिया दिली आहे. सिद्धरामय्यांसारखे शंभर जण आले तरी मला अटक करणे शक्य नाही. मी भयभीत झालो आहे का?, माझ्याकडे पाहिले तर तसे वाटते का?, असे प्रश्न कुमारस्वामी यांनी केले. मागील आठवड्यापासून सिद्धरामय्या कसे वागत आहेत, हे जनतेने पाहिले आहे. म्हैसूर नगरविकास प्राधिकरणाची मालमत्ता ही आपलीच मालमत्ता असल्याचे ते सांगत आहेत. त्यांच्यासारखा ढोंगी मुख्यमंत्री मी कधीच पाहिलेला नाही, असे ताशेरेही कुमारस्वामी यांनी ओढले.

कुमारस्वामींना अटक करण्यासाठी एक कॉन्स्टेबल पुरेसा!

एच. डी. कुमारस्वामी यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर प्रत्युत्तर देताना सिद्धरामय्या यांनी, कुमारस्वामी यांना अटक करण्यासाठी शंभर सिद्धरामय्या नकोत, एक कॉन्स्टेबल पुरेसा आहे, अशी टिप्पणी केली आहे. कुणालाही अटक करायची असेल तर ती कारवाई पोलीस खाते करते, मी नव्हे. कुमारस्वामी भयभीत झाल्याने त्यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. प्रकरणाचा संपूर्ण तपास करण्यासाठी आयोग नेत्यात आला असून सत्य उघडकीस येईल. कुमारस्वामी जे सांगत आहेत, ते सत्य  आहे का, हे तपासातून स्पष्ट होईल, असेही सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.