कला अकादमीच्या दुरुस्तीची 1990 साली गरज होती!
मंत्री गोविंद गावडे यांची माहिती : चार्ल कुरैय्या फाऊंडेशनही उपाय सूचवू शकले नाही
पणजी : कला अकादमीची वास्तू भरती रेषेपासून केवळ 2.5 मीटर अंतरावर आहे. कला अकादमीच्या समस्यांना चार्ल्स कुरैय्या फाउंडेशनही यावर उपाय सुचवू शकले नाहीत. 1990 ह्या वर्षी कला अकादमीच्या दुऊस्तीची गरज होती, ती त्यावेळी करण्यात आली नाही, असे कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी विधानसभा सभागृहात सांगितले. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि आमदार विजय सरदेसाई यांनी कला अकादमीच्या कामाचे पुन्हा लेखापरीक्षण करण्याची जोरदार मागणी केली होती. युरी आलेमाव आणि विजय सरदेसाई यांचे कला अकादमीच्या बांधकाम नूतनीकरणावरून आरोप सुरू असतानाच सभागृहात ग्रामीण विकास यंत्रणा, क्रीडा आणि कला संस्कृती खात्याच्या मागण्यांना मान्यता देण्यात आली.
वक्तव्याचा अनर्थ
ताज महालाविषयी मी केलेल्या व्यक्तव्याचा अनर्थ करून मला दोष देण्याचा घाट ट्रोल आर्मीकडून सुरू आहे. मी संघर्षातून आलेली व्यक्ती असल्याने संघर्षाला सामोरे जाण्यास मी घाबरत नाही, असे मंत्री गावडे यांनी सभागृहात सांगितले. कला आणि संस्कृती खात्याने कला अकादमीच्या सर्व कामांची यादी सार्वजनिक बांधकाम खात्याला सादर केलेली असून, सर्व कामे पूर्ण केली जातील. काम अर्धवट राहणार नाही. कला अकादमीची वास्तू रचना सोडली तर इतर सर्व गोष्टीत चार्ल्स कुरैय्या फाऊंडेशनचे कोणतेच योगदान नाही, असे मंत्री गावडे यांनी सभागृहात सांगितले.
गेल्या कित्येक वर्षे दिनानाथ मंगेशकर सभागृहात पावसाचे पाणी येत होते. त्यामुळे सभागृह बंद ठेवावे लागत होते. नूतनीकरणानंतर पावसातही कला अकादमीचे काम सुरू होते. यापूर्वी 2004 साली इफ्फी महोत्सवामुळे कला अकादमीची दुऊस्ती झाली. तेव्हा ब्लॅक बॉक्स या ठिकाणी बदल करण्यासहित एकोस्टिक यंत्रणेतही बदल करण्यात आला. चार्ल्स कुरैय्या हे त्यावेळी हयात होते. कला अकादमीच्या वस्तू रचनेत भोवतालचे वातावरण पूरक नाही. ओपन एअर ऑडिटोरियमचे कवचे पडू लागल्याने ऑगस्ट 2018 या साली बुकींग बंद करावे लागले, असेही मंत्री गावडे यांनी सभागृहात सांगितले.
ग्रंथालय धोरण लवकरच...
सर्व आमदार तसेच मंत्री यांना विश्वासात घेऊन ग्रंथालय धोरण तयार करण्याचा प्रयत्न आहे. ग्रंथालय धोरण लवकरच तयार होणार असून, हे ग्रंथालय धोरण करणारे गोवा हे देशातील पहिले राज्य असेल. पाटो पणजी येथील मध्यवर्ती ग्रंथालयातील वातानुकूलित यंत्रणा दुऊस्त करण्यात आली आहे. त्या ठिकाणी असलेल्या हजारो पुस्तकांचे डिजीटलायजेशन करण्याचे काम सुरू होणार आहे. राज्यातील विविध ठिकाणी आणखी 78 ग्रंथालय सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी प्रत्येक आमदारांची मागणी आल्यास त्यांनाही हव्या त्या ठिकाणी ग्रंथालय सुरू करण्याचा विचार करण्यात येईल, असे मंत्री गोविंद गावडे म्हणाले.
म्हापसा, रवींद्र भवनाला हवी जागा....
म्हापसा रवींद्र भवनासाठी सर्व आमदारांनी एकत्र येऊन जागेची निवड करणे गरजेचे आहे. जागा निश्चित झाल्यानंतर म्हापसा रवींद्र भवनचे काम सुरू करण्यात येईल. काणकोण रवींद्र भवनचे उद्घाटन 15 ऑगस्टनंतर करण्यात येणार आहे. कुडचडे रवींद्र भवनचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे, असेही मंत्री गावडे यांनी सांगितले.