काजल, निलम उपांत्य फेरीत
वृत्तसंस्था, अॅस्टेना
येथे सुरू असलेल्या विश्व कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत महिलांच्या विभागात भारताच्या काजल धोचक आणि निलम यांनी आपल्या वजन गटातून उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला आहे.
महिलांच्या 76 किलो वजन गटातील उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत आतापर्यंत दोनवेळा 20 वर्षांखालील वयोगटात विश्वविजेतेपद मिळविणाऱ्या भारताच्या काजल धोचकने मंगोलियाच्या अमरचा 9-2 अशा गुणांनी पराभव करत शेवटच्या चार स्पर्धकांमध्ये आपले स्थान निश्चित केले तसेच महिलांच्या 50 किलो वजन गटातील उपांत्य पूर्व फेरीच्या लढतीत भारताच्या निलमने बेलारूसच्या नातालिया व्हॅरेकिनाचा 6-0 अशा गुणांनी एकतर्फी पराभव केला. या स्पर्धेत रशियाची टॉपसिडेड महिला मल्ल सिमरनोव्हाने दुखापतीमुळे उपांत्य पूर्व फेरीच्या लढतीतून माघार घेतली. महिलांच्या 57 किलो वजन गटात भारताच्या नेहा शर्माने अल्गेरियाच्या टिकॉकचा 4-2 अशा गुणांनी पराभव केला. पण पुढील फेरीत नेहाला बेलारूसच्या इरिनाने पराभूत केले. ग्रिको रोमन प्रकारामध्ये भारताच्या ललितने 55 किलो वजन गटात पदक फेरी गाठली असून भारताच्या इतर मल्लांकडून साफ निराशा झाली आहे.