‘द इंडिया स्टोरी’मध्ये काजल अग्रवाल
अभिनेत्री काजल अग्रवालने स्वत:चा आगामी चित्रपट ‘द इंडिया स्टोरी’चे चित्रिकरण सुरू केले आहे. तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक छायाचित्र शेअर करत स्वत:चा आनंद व्यक्त केला आहे. या छायाचित्रात ती चित्रपटाच्या सेटवर क्लॅपरबोर्ड पकडून असल्याचे दिसून येते. पुणे शहरात याचे चित्रिकरण सुरू आहे. या चित्रपटाद्वारे प्रभावी कहाणी जिवंत करण्यासाठी मी अत्यंत उत्सुक आहे. हा चित्रपट 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार असल्याचे काजलने कॅप्शनदाखल नमूद केले आहे.
या चित्रपटात काजल अग्रवाल आणि श्रेयस तळपदे मुख्य भूमिकेत दिसून येणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन चेतन डीके करत आहेत. एमआयजी प्रॉडक्शन अँड स्टुडिओजकडुन याची निर्मिती करण्यात येत आहे. द इंडिया स्टोरीची कहाणी रंजक असण्यासोबत वादग्रस्त देखील आहे. या चित्रपटात कीटकनाशक कंपन्यांशी निगडित अनेक प्रमुख घोटाळ्यांना दाखविले जाणार आहे. परंतु चित्रपटाची कहाणी अद्याप गुप्त ठेवण्यात आली आहे. काजल यापूर्वी मागील वर्षी ‘सत्यभामा’ चित्रपटात दिसून आली होती. याचबरोबर इंडियन 2 चित्रपटात तिने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती.