‘कायझेन’ : मोठ्या सुधारणांसाठीचे ‘छोटे पॅकेट’
दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटच्या टप्प्यात अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या दोन मोठ्या शहरांवर अणुबॉम्ब टाकून ही दोन्ही संपूर्णपणे बेचिराख केली. दोन अणुहल्ले केले आणि उगवत्या सूर्याच्या या देशाला एक मोठे ग्रहणच लागले. या अतिशय विनाशक अणुबॉम्ब हल्यांमुळे जपानला दुसऱ्या महायुद्धात शरणागती पत्करावी लागली. या अणुहल्ल्यांनी जपानचा कणाच मोडून काढला. अर्थव्यवस्था कोलमडून टाकली. अस्मिता बेचिराख केली, पण जपान आणि जपानी माणूस हा अत्यंत चिवट वृत्तीचा मानला जातो. इतक्या महाकाय संकटाला सामोरे जाऊनही त्यांच्यात पुन्हा उभे राहण्याची उमेद जीवंत होती. आपल्याकडे शिल्लक राहिलेल्या रद्दी आणि कचऱ्यापासूनच जपानने आपली अर्थव्यवस्था उभी करायला सुरुवात केली. रद्दीमालाची बाजारपेठ ते आज जगात सर्वात उत्कृष्ट दर्जाचे उत्पादन करणारा देश या जपानच्या वाटचालीचे श्रेय जाते ते त्याच्या व्यवस्थापकीय कार्यपद्धतीला. या कार्यपद्धतींपैकी एक आहे ‘कायझेन’. ‘कायझेन’ या जपानी शब्दाचा अर्थ हा ‘काय’ म्हणजे बदल आणि ‘झेन’ म्हणजे चांगला. कायझेन म्हणजे चांगला बदल. ‘कायझेन’मध्ये आपण दररोज जे करतो, त्यामध्ये काही ना काही चांगला बदल आणि तोही सामुहिकरीत्या केला जातो. कायझेन सिद्धांत जपानच्या ताओवादी आणि बौद्ध वारसा यांच्यात एक मिश्रण म्हणून उदयास आला. याचा परिणाम सराव हा आहे आणि यातून रोजच छोट्या छोट्या स्वरूपात सुधारणांची साखळी विणली जाते व यामधून अतिशय उत्कृष्ठ कर्तव्यदक्षता साध्य केली जाते. खरं तर, कायझेन शब्द बनवणाऱ्या सायनोग्रामचा अर्थ असा आहे: चांगल्यासाठी बदला. काही जण त्याचे असे भाषांतर करतात सुधारणा वा चांगुलपणा. कायझेन सिद्धांत म्हणजे नेमके काय? कायझेन पूर्वेकडील लोक ज्याला ‘परिपूर्णता’ म्हणतील आणि पाश्चात्य व्यापारी ज्याला ‘ऑप्टिमायझेशन’ म्हणतील त्याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे. महत्त्वाचे म्हणजे काम आणि जीवनासाठी हा मूलभूत दृष्टिकोन आणि तत्वज्ञान आहे.
सतत सुधारणांच्या वरच्या दिशेने गोष्टींना त्यांच्या सर्वोत्तम अभिव्यक्तीमध्ये आणण्याची जबाबदारी स्वीकारा. कालपेक्षा आज चांगला आणि उद्या आजपेक्षा चांगला. सुधारणांसाठी ही गोष्ट एक उत्तम मार्केटिंग संकल्पना बनली आहे. या तत्वज्ञानाचा वापर व्यवसाय पद्धती सुधारणाऱ्या धोरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरला जातो आहे. कायझेन ही अशी एक शिस्तबद्ध कार्यपद्धती आहे की, यात ज्या ठिकाणी काम केले जाते, म्हणजेच ज्या ठिकाणी समस्या आहे त्या ठिकाणी जाऊन समस्या काय आहे, याचे प्रत्यक्ष निरीक्षण केले जाते. नंतर शास्त्रशुद्ध तंत्रांचा वापर करून त्या समस्येवर व्यवहारी तोडगा काढला जातो. ‘कायझेन’ची सुरुवात - 1950 ते 1960 या काळात अमेरिकन तज्ञ डॉ. एडवर्ड डेमिंग आणि डॉ. जोसेफ जुरान यांच्याकडून जपानी लोकांनी गुणवत्ता तत्वज्ञान घेतले. ‘कायझेन’ या तत्वज्ञानाचा वापर करीत त्यांनी अनेक कार्यपद्धतीचा विकास केला आणि आपला संपूर्ण उद्योग गुणवत्तेच्या उंच शिखरावर नेला. ‘कायझेन’ हा शब्द दोन जपानी शब्दांनी तयार झालेला आहे. काय आणि झेन. काय म्हणजे बदल आणि झेन म्हणजे अधिक चांगला होण्याच्या दृष्टीने केलेला बदल. ‘कायझेन’ म्हणजे छोट्या-छोट्या सुधारणांची अशी शृंखला, की ज्यात कमी तंत्रज्ञान, कमी खर्च करून केलेले बदल, ज्या बदलांमुळे प्रचंड मोठ्या सुधारणा होतात. ‘कायझेन’ म्हणजे माणसात असणाऱ्या अमर्याद कल्पनाशक्तीवरचा विश्वास आहे.
‘कायझेन’ म्हणजे आहे त्या परिस्थितीबद्दल समाधानी कधीच राहू नका, असे सांगणे आहे.
‘कायझेन’ म्हणजे उत्कृष्टतेकडे नेणारी वाटचाल आहे. ‘कायझेन’ ही एक विचारप्रक्रिया आहे. यात कोणताही विशिष्ट ढाचा वापरला पाहिजे असे नाही.
कायझेन समस्या सोडविताना एक विशिष्ट कालावधीच हवा असे नाही. अनेक लहान लहान कल्पना या एकाच मोठ्या कल्पनेपेक्षा जास्त परिणामकारक, उपयुक्त असतात.
‘कायझेन’ म्हणजे ‘ब्रेन स्टॉर्मिंग नाही तर ट्राय स्टॉर्मिंग आहे. कायझेनच्या वापराने काम करणाऱ्यांची कामे सोपी होऊन जातात. कायझेन ही एक जीवनपद्धतीच आहे. आपल्या अवती-भवतीची परिस्थिती आणि वातावरण सतत बदलत असते. ‘कायझेन’ चा वापर करून अशा सतत बदलणाऱ्या गोष्टींचा आपण उत्तम सामना करू शकतो. ‘कायझेन’ या कार्यपद्धतीत सतत सुधारणा करण्याचे तत्वज्ञान आणि दैनंदिन कार्यपद्धती यांचा सुरेख संगम आहे. ही कार्यपद्धती, हे तत्वज्ञान कोणालाही शिकता येते. त्यात कोणाचीही मत्तेदारी नाही. कोणत्याही कामात ‘कायझेन’ प्रणाली वापरता येते. कायझेन म्हणजे ‘जैसे थे’ या मनोवृत्तीला आव्हान देणे. कोणतीही गोष्ट आहे तशी न स्वीकारता ‘ती तशीच का?’ याचा विचार करून सुधारणेच्या दृष्टीने त्यात बदल करणे, ‘कायझेन’ म्हणजे निरंतर सुधारणा. स्वत:लाच विचार करण्यास प्रवृत्त करा. विचार करण्याची शक्ती हे माणसाला मिळालेले वरदान आहे.
प्रत्येक लहान शिस्तबद्ध कृती, प्रत्येक लहान सुधारणा, ती ज्या व्यवस्थेशी संबंधित आहे तिच्या एकूण सुधारणेत योगदान देते. आपण या मार्गाचे अनुसरण केल्यास, आपली प्रत्येक कृती अपरिहार्यपणे सुलभ होऊन जाईल. यामधून सखोल कार्य आणि वैयक्तिक मूल्ये तयार होतील आणि निरोगी व उत्पादक सवयी तयार होतील. अक्षरश: प्रत्येक प्रकारच्या व्यवसायाची जागा कायझेनद्वारे परिपूर्ण केली जाऊ शकते. प्रचंड मोठी क्षमता असणारी कायझेन ही साधी सोपी विचारसरणी आणि कार्यपद्धती आहे. याची सुरूवात जपानमध्ये झाली असली, तरी ही अशी जीवनप्रणाली आहे, की जिचा वापर कारखाना, कार्यालय, शाळा-महाविद्यालय, घर किंबहुना जिथे-जिथे माणसाचा वावर आहे आणि त्यांना सुधारणा करण्याची इच्छा आहे, अशा प्रत्येक जागेत होऊ शकतो. छोट्या-छोट्या पण अव्याहत होणाऱ्या सुधारणांमुळे मोठ-मोठी स्थित्यंतरे घडवून आणण्याची क्षमता या छोट्या पॅकेट कायझेनमध्ये निश्चितच आहे.
-प्रा. डॉ. गिरीश नाईक