कैलाश गेहलोत यांचा भाजपमध्ये प्रवेश
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दिल्लीचे माजी मंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते कैलाश गेहलोत यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. त्यांनी रविवारी दिल्ली सरकारमधून मंत्रिपदाचा त्याग केला होता. त्यांनी आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार टीका करत आम आदमी पक्ष आणि आपले मंत्रिपद या दोन्हींचा राजीनामा दिला होता.
सोमवारी त्यांनी हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यासह भारतीय जनता पक्षाच्या अनेक मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. भारतीय जनता पक्षाच्या दिल्ली शाखेचे निवडणूक प्रभारी बैजयंत पांडा, राष्ट्रीय महासचिव दुष्यंत गौतम आणि पक्षाच्या दिल्ली शाखेचे अध्यक्ष विरेंद्र सचदेवा हे यावेळी उपस्थित होते.
हाती होते महत्वाचे विभाग
गेहलोत यांच्या हाती गृहृ, वाहतूक, प्रशासकीय सुधारणा, माहिती तंत्रज्ञान आणि डब्ल्यूसीडी असे अत्यंत महत्वाचे विभाग होते. तरीही त्यांनी पक्षातील बेशिस्त, वशिलेबाजी आदी मुद्द्यांवर राजीनामा दिला होता. केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री असताना त्यांनी आपल्या सरकारी निवासस्थानाच्या आधुनिकीकरणासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च केला होता. अशी सरकारी पैशाची उधळपट्टी आपल्याला कधीच संमत नव्हती, असे प्रतिपादन त्यांनी मंत्रिपद सोडल्यानंतर व्यक्त केले होते.
आश्वासनांची पूर्ती नाही
आम आदमी पक्षाच्या सरकारने केंद्र सरकारशी विनाकारण संघर्ष करण्यातच आपला वेळ घालविला. त्यामुळे जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता या सरकारकडून झाली नाही. आम आदमी पक्ष जनताभिमुख नसून केवळ राजकीय विचार करणारा आहे, त्यामुळे आपल्याला या पक्षाचा उबग आला होता. म्हणून आपण मंत्रीपद आणि पक्ष यांचा त्याग केला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.
आम आदमी पक्षाचे आरोप
गेहलोत यांनी ईडीची कारवाई टाळण्यासाठी आम आदमी पक्षाला सोडले आहे, असा आरोप अरविंद केजरीवाल आणि दिल्लीच्या विद्यमान मुख्यमंत्री आतिशी यांनी केला आहे. ते पक्ष सोडणार असल्याची आम्हाला जाणीव होती. ते गेल्याने काही बिघडत नाही. त्यांचा लोकांवर प्रभाव नव्हता. त्यामुळे आम आदमी पक्षाचे त्यांच्यावाचून अडत नाही, अशी प्रतिक्रिया या पक्षाच्या नेत्यांनी दिली आहे. मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांनी त्यांच्या त्यागपत्राचा स्वीकार केला आहे.