For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कैगा अणुभट्टीच्या काँक्रिटीकरणाला चालना

11:14 AM Mar 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
कैगा अणुभट्टीच्या काँक्रिटीकरणाला चालना
Advertisement

अणुभट्टी क्रमांक पाच-सहाची क्षमता प्रत्येकी 700 मेगावॅट राहणार : उभारणीसाठी 2100 कोटी खर्च अपेक्षित : सुरक्षिततेच्या दृष्टीने विशेष लक्ष

Advertisement

कारवार : येथून जवळच्या कैगा अणुऊर्जा प्रकल्पातील एका नव्या अध्यायाला रविवारी सुरुवात करण्यात आली. कर्नाटकातील एकमेव अणुऊर्जा प्रकल्पातील अणुभट्टी क्रमांक पाच आणि सहा उभारणीला काँक्रिटीकरण कामाला अणुशक्ती आयोगाचे अध्यक्ष आणि केंद्र अणुशक्ती खात्याचे कार्यदर्शी डॉ. अजितकुमार मोहंती आणि न्युक्लियर पॉवर कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक भुवनचंद्र पाठक यांच्या हस्ते चालना देण्यात आली. यावेळी कैगा अणुऊर्जा प्रकल्पातील अणुभट्टी क्रमांक पाच आणि सहाचे संचालक कुलकर्णींसह प्रकल्पाचे अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कैगा अणुऊर्जा प्रकल्पात प्रत्येकी 220 मेगावॅट क्षमतेच्या चार अणुभट्ट्या कार्यरत आहेत. अणुभट्टी क्रमांक पाच आणि सहाची क्षमता प्रत्येकी 700 मेगावॅट इतकी राहणार आहे. अणुभट्टी क्रमांक पाच आणि सहा कार्यान्वित झाल्यानंतर कैगा प्रकल्पाची ऊर्जा निर्मिती दोन 2,280 मेगावॅट इतकी होणार आहे. कैगा अणुऊर्जा प्रकल्पातील पहिली अणुभट्टी 2000 मध्ये कार्यान्वित करण्यात आली आहे. कैगा प्रकल्पातील अणुभट्ट्यांनी अनेक विक्रम ऊर्जा निर्मितीच्या बाबतीत आपल्या नावावर यापूर्वीच प्रस्थापित केले आहेत. याशिवाय पर्यावरणाच्या बाबतीतही कैगा अणुऊर्जा प्रकल्पाने उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.

Advertisement

अणुभट्टी क्रमांक पाच-सहा 2030 मध्ये सज्ज होणार

अणुभट्टी क्रमांक पाच आणि सहा उभारणीसाठी सुमारे 2,100 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या महत्त्वाकांक्षी अणुभट्ट्या उभारण्यासाठी किंवा कार्यान्वित होण्यासाठी 2030 पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. अणुभट्टी पाच आणि सहा उभारणीसाठी उत्खनन, टर्बाईन द्वीप, परमाणु द्वीप आणि इंस्ट्रुमेंटेशनसाठी नवीन रणनीतीचा वापर केला जाणार आहे.

स्थानिकांना रोजगार

अणुभट्टी क्रमांक पाच आणि सहामुळे स्थानिकांना रोजगार आणि व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. त्याद्वारे कैगा परिसराचा आर्थिक विकास आणि पायाभूत सुविधांचा विकास होण्यास हातभार लागणार आहे. एका अंदाजानुसार नव्याने उभारण्यात येणाऱ्या अणुभट्ट्यांमुळे प्रत्येकी 1400 ते 1600 स्थानिकांना रोजगाराच्या संधी मिळतील, असे सांगण्यात आले.

अत्याधुनिक अणुभट्ट्या

कैगा अणुऊर्जा प्रकल्पातील आकार घेत असलेल्या अणुभट्टी क्रमांक पाच आणि सहा स्वदेशी व अत्याधुनिक राहणार आहेत. पी.एच.डब्ल्यू.आर. स्वरुपाच्या या नियोजित अणुभट्ट्यांमध्ये सुरक्षिततेच्या बाबतीत विशेष लक्ष राहणार असून या  अणुभट्ट्या जगात सर्वात अधिक सुरक्षित मानल्या जातात.

Advertisement
Tags :

.