कैची धाम : संतांची तपोभूमी
कैची धाम हे उत्तराखंडमधील ठिकाण असून ते भारतातील एक प्रमुख धार्मिकस्थळ आहे. हे स्थान हिमालयाच्या पर्वतरांगेत स्थित असून येथे अनेक तीर्थस्थळं आहेत. कैची धाममध्ये दरवर्षी जगभरातून मोठ्या संख्येत अध्यात्मिक पर्यटक दाखल होत असतात. प्रसिद्ध संत नीम करोली बाबा यांनी येथे आश्रम स्थापन केला होता, जो आता लोकांसाठी शांतता अन् अध्यात्मिक केंद्र ठरला आहे. अंतर्गत शांततेसाठी देश अन् विदेशातून मोठ्या संख्येत भाविक येथे येत असतात. कैंची धाम हे नैनीताल शहरानजीक आहे.
उत्तराखंडच्या नैनीताल जिलह्यातील कैची धाम हे ऋषी-मुनींचे साधनास्थळ राहिले आहे. मागील काही दशकांमध्ये याची ख्याती संत नीब करौरी बाबांमुळे झाली आहे. येथे अॅपल कंपनीचे सह-संस्थापक स्टीव्ह जॉब्स, फेसबुकचे अध्यक्ष मार्क जुकेरबर्ग, क्रिकेटपटू विराट कोहली, अभिनेत्री अनुष्का शर्मा, प्रिटी झिंटा देखील पोहोचली होती. कैची धाम येथील संत सोमवारी गिरी महाराज देखील चर्चित राहिले आहेत. कैची हे दोन पर्वतांदरम्यान स्थित असून ते कात्रीसारखा आकार निर्माण करत असल्याने याला कैची धाम म्हटले जाते. कैची मंदिरानजीक एक गुहा असून तेथेच महाराजजी ध्यान अन् प्रार्थना करायचे असे सांगण्यात येते.
राजकीय व्यक्ती अन् विदेशी भक्त
नीब करौरी महाराजांनी 15 जून 1964 रोजी कैची धाममध्ये हनुमान मंदिराची स्थापना केली होती. मंदिरासाठी भूमी तत्कालीन वनमंत्री आणि माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांनी वितरित केली होती. तर उद्योजक घनशाम दास बिर्ला यांनी आर्थिक सहकार्य केले होते. नीब करौरी महाराजांच्या भक्ताच्या यादीत देशविदेशातील नामी व्यक्तिमत्त्व राहिली आहेत. माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्राr, माजी राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा देखील कैची धाममध्ये पोहोचले हेते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही नीब करौरी महाराजांची महिमा एकदा वर्णिली ओ. 70 च्या दशकात हिप्पी संस्कृती वेगाने वाढत असताना अनेक देशांमधून लोक कैची धाममध्ये पोहोचले होते. त्यांच्यासाठी नीब करौरी बाबांच्या नावाचा उच्चार करणे कठिण असायचे, याचमुळे ते त्यांना ‘नीम करोली बाबा’ असे संबोधित करायचे. या भक्तांनी स्वत:चे अनुभव मांडत अनेक अनेक पुस्तके लिहिली आहेत. यामुळे मोठ्या संख्येत विदेशी भक्त कैची धाममध्ये पोहोचू लागले आहे.
शेतीसाठी अनुकूल वातावरण
कैची धामचे वातावरण फळे अन् भाज्यांच्या पिकांसाठी अत्यंत अनुकूल आहे. येथे आंबे, लीची, नाशपाती आणि पहाडी फळं प्लम, खुबानी, आडूची देशविदेशात मोठी मागणी आहे. येथील लोकांच्या उत्पन्नाचे मुख्य साधन शेती आहे. मागील काही वर्षांमध्ये लोकांनी होम स्टे उद्योगातही मोठी रुची दाखविली आहे. सांप्रदायिक सौहार्द कैची धाम क्षेत्राचे शक्तिस्थान आहे. येथील लोक मूळ स्वरुपात हिंदीभाषिक आहेत. तर लोकभाषा कुमाऊंनी असून ती मागील काही वर्षांमध्ये मागे पडली होती. परंतु युवा पिढी या लोकभाषेला पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न करतेय. तर येथील पारंपरिक पहाडी भोजन भट्ट की डाल, मडुवे की रोटी, भांग की चटनी, आलू के गुटके या व्यंजनामुळे प्रसिद्ध झाले आहे.
जैवविविधता अन् वनबाहुल्य क्षेत्र
वनसंपदा, जैवविविधता, वनस्पती अन् वनौषधींमुळे कैंची धाममध्ये वातावरण सुरम्य असते. चहुबाजूला पर्वत, जंगल, नदी, झरे, देवत्वाची जाणीव करून देतात. पक्ष्यांच्या अनेक प्रजाती येथे आढळून येतात. देशातील पहिले मॉस गार्डन कैचीधामनजीक हल्दानीच्या नैनीताल जिल्ह्यात आहे. फुलपाखरांच्या अनेक प्रजाती केवळ येथेच आढळून येतात. येथे औषधी गुणधर्माने युक्त अनेक फळं अन् फुलं आढळून येत असल्याने आयुर्वेदिक तज्ञांकडून येथे संशोधन केले जाते.
उत्तरवाहिनी क्षिप्रानदी
देशाच्या बहुतांश नद्या दक्षिणवाहिनी म्हणजेच उत्तरेकडून दक्षिणेच्या दिशेला वाहणाऱ्या आहेत. परंतु कैची धाममध्ये वाहणारी क्षिप्रा नदी हे उत्तरवाहिनी आहे. कैची धामच्या भौगोलिक स्थितीमुळे हे घडले आहे. या नदीचे वर्णन स्कंद पुराणाच्या मानसंखडात करण्यात आले आहे. क्षिप्रा नदीवरून एक किस्सा देखील प्रख्यात आहे. कैची धाममध्ये भंडाऱ्यासाठी एकदा तूप संपल्यावर नीब करौरी बाबा यांनी क्षिप्रा नदीच्या जलाला तूपात रुपांतरित केल्याची वंदता आहे.
बदलले शहराचे स्वरुप
कैची धाममध्ये पूर्वी मोजके पर्यटक यायचे, त्यावेळी पक्का रस्ता नव्हता, तसेच मूलभूत सुविधाही नव्हत्या. शाळा, रुग्णालयासाठी अनेक किलोमीटरचे अंतर कापावे लागत होते, विकासाच्या पाऊलखुणा कित्येक कोस दूर होत्या. परंतु अध्यात्मिक स्थळाच्या स्वरुपात लोकप्रिय हहेताच कैची धामचा कायाकल्प झाला आहे. आज देशाच्या विविध राज्यांच्या लोकांनी कैची धाममध्ये जमीन खरेदी केली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून येत लोक कैची धाममध्ये स्थायिक होऊ लागले आहेत. लोक शांततेचे महत्त्व ओळखून कैची धामला स्वत:चे घर करत आहेत.
शक्तिपीठ
कैची धामनजीक अनेक शक्तिपीठं आहेत. यात भगवान शिवाचे जागेश्वर धाम, अद्भूत चुंबकीय शक्ती असलेले कसार देवी मंदिर, स्वामी विवेकानंद यांचे तपस्थळ काकडीघाट यासारखी तीर्थस्थळ सामील आहेत. याचबरोबर उत्तराखंडच्या चारधामचा मार्ग देखील कैचीधाममधून जातो. याचमुळे बद्रीनाथ, केदारनाथ येथे जाणारे भाविक कैची धामचेही दर्शन करून घेतात.
पोहोचण्याचा मार्ग
येथे येणाऱ्या भक्तांची संख्या वेगाने वाढत आहे. भक्तांना असुविधा होऊ नये म्हणून प्रशासन शक्य ती सर्व व्यवस्था करत आहे. मोठ्या संख्येत लोक येत असलयाने येथे वाहतूक कोंडीची समस्या अत्यंत वाढली आहे. या वाहतूक कोंडीला टाळण्यासाठी बायपास रोडची निर्मिती केली जात आहे. बहुमजली पार्किंग आणि हेलिपॅडच्या निर्मितीमुळे भाविकांना दिलासा मिळणार आहे. कैची धामच्या सर्वात नजीक असलेले रेल्वेस्थानक काठगोदाम असून तेथून देशभरासाठी रेल्वेगाड्या संचालित हाता. तर बस अन् टॅक्सीच्या माध्यमातूनही कैची धाम येथे पोहोचता येते. नजीकचे विमानतळ पंतनगर येथे आहे. कैची धाम असा अलौकिक अनुभव आहे, जो प्रत्येक भक्त अनुभवू इच्छितो.
सर्वात चांगला काळ कोणता
कैची धाम येथे वर्षातील कुठल्याही महिन्यात जाता येते. हे पूर्ण वर्ष भाविकांसाठी खुले असते. परंतु मार्च ते जून आणि सप्टेंबर ते नोव्हेंबर हा कालावधी येथे जाण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. कारण यादरम्यान तेथे अधिक उष्णता नसते आणि पावसाचे प्रमाणही कमी असते. परंतु जुलै ते ऑगस्टदरम्यान येथे जाणे टाळणे योग्य ठरेल.

नीब करौली बाबा आश्रमाचा इतिहास अन् महत्त्व
उत्तराखंडमधील नीब करौली बाबांचा आश्रम हा देशविदेशातील अध्यात्मप्रेमींसाठी पसंतीचे ठिकाण आहे. या आश्रमाला कैची धाम नावानेही ओळखले जाते. हा आश्रम नैनीतालपासून सुमारे 17 किलोमीटर तर भवालीपासून 9 किलोमीटर अंतरावर आहे. 15 जून 1964 रोजी नीब करौली बाबा आणि त्यांच्या भक्तांनी या आश्रमाची स्थापना केली होती. नीब करौली बाबा यांना अनेक लोक भगवान हनुमानाचा अवतारही मानतात. या आश्रमात नीब करौली बाबांसोबत हनुमान, राम-सीता समवेत अन्य देवीदेवतांचीही मंदिरे आहेत. नीब करौली बाबा हे हनुमानाचे परमभक्त होते आणि त्यांनी स्वत:च्या जीवनकाळात हनुमानाची अनेक मंदिरे स्थापन करविली होती.
कोण होते नीब करौली बाबा
नीब करौली बाबा यांना भक्त महाराजजी नावाने संबोधितात. त्यांचा जन्म उत्तरप्रदेशच्या फिरोजाबाद जिल्ह्यातील अकबरपूर गावातील एका धनाढ्या ब्राह्मण जमीनदार परिवारात झाला होता. त्यांचे खरे नाव लक्ष्मी नारायण शर्मा होते आणि वयाच्या 11 व्या वर्षीच त्यांचा विवाह झाला होता, परंतु त्यांचे मन संसारात रमले नाही. त्यांनी साधू होण्याचा निर्णय घेतला आणि घर सोडले. परंतु पित्याच्या सूचनेनंतर ते काही काळासाठी परतले आणि परिवाराची जबाबदारी सांभाळली. त्यांना दोन पुत्र अन् एक कन्या होती. पण अध्यात्मिक मार्गाकडील त्यांचा कल कायम राहिला. वयाच्या 17 व्या वर्षीच त्यांना ज्ञान प्राप्ती झाली होती आणि त्याचे गुरु भगवान हनुमान हेच होते असे बोलले जाते. नीम करौली बाबा यांनी अनेक लोकांच्या जीवनाला योग्य मार्ग दाखविला होता.
त्यांनी दोन आश्रम स्थापन करविले होते, ज्यातील एक उत्तराखंडच्या कैची येथे तर दुसरा उत्तरप्रदेशच्या मथुरा जिल्ह्यातील वृंदावन येथे आहे. त्यांनी वृंदावनला स्वत:च्या महासमाधीसाठी निवडले होते. 10 सप्टेंबर रोजी आगरा येथे पोहोचल्यावर ते त्वरित वृंदावनसाठी रवाना झाले, जेथे 11 सप्टेंबर 1973 रोजी त्यांनी महासमाधी घेतली होती.