कागल नवीन नाक्याविरोधात आंदोलन करणारच
लॉरी ऑपरेटर असोसिएशनचा निर्धार
आंदोलन चिरडल्याचा आरोप
पोलिसांनी असोसिएशनचे अध्यक्ष, सेक्रेटरींना तब्बल 18 तासाने सोडले
कोल्हापूर
लॉरी ऑपरेटर असोसिएशनच्यावतीने सोमवारी सकाळी कागल येथील सीमा तपासणी नाक्याच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात येणार होते. पंरतू पोलिस प्रशासनाने त्यांना परवानगी दिली नाही. तसेच असोसिएशनचे अध्यक्ष, सेक्रेटरी यांना रविवारी ताब्यात घेत सोमवारी दुपारी 4.30 वाजता म्हणजेच 18 तासाने सोडले. यानंतर असोसिएशनने प्रशासनाचे हुकूमशाही सुरू असून आंदोलन चिरडल्याचा आरोप केला. तसेच कागल चेकपोस्ट येथे आंदोलन करणारच असा निर्धारही केला आहे.
असोसिएशनने दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, कागल येथे खासगी आरटीओ चेक पोस्टला जिल्हा लॉरी ऑपरेटर असोसिएशनचा विरोध आहे. चेक पोस्ट सुरू होऊ नये म्हणून असोसिएशन सोमवारी सकाळी 10 वाजता ट्रक टेम्पो वाहनासह रॅलीने शाहू जकात नाका ते कागल येथील खासगी आरटीओ चेक पोस्टवर जाऊन धरणे आंदोलन करणार होती. परंतु लोकशाहीने दिलेल्या अधिकारानुसार शांततेने केले जाणारे आंदोलन चीरढण्याच्या दृष्टीने प्रशासन लोकशाहीमध्ये दिलेला आंदोलनाचा अधिकार हिरावून घेत आहे.
हुकूमशाही पद्धतीने ब्रिटिश पॉलिसी वापरून आदल्या दिवशीच म्हणजे रविवारी रात्री दहा वाजता शाहूपुरीतील असोसिएशन कार्यालयामधून अध्यक्ष सुभाष जाधव, सेक्रेटरी हेमंत डिसले यांना राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये आणले. दोघांचे मोबाईल फोन काढून घेऊन ताब्यात घेतले. आंदोलनाचा कालावधी संपल्यानंतर सोमवारी दुपारी 4.30 वाजता त्यांना सोडले. दरम्यान, सकाळी साडेनऊ वाजल्यापासून कोल्हापूर जिह्यातून आलेले अडीचशे ते तीनशे वाहतूक संघटना प्रतिनिधी व वाहतूकदार राजारामपुरी पोलीस स्टेशनच्या परिसरात बसून होते.
दोन दिवसांत बैठक, आंदोलनाची पुढील दिशा ठरविणार
कोणत्याही परिस्थितीत खासगी आरटीओ चेक पोस्टला विरोध कायम राहणार आहे. चोक पोस्ट सुरू होऊ नये म्हणून कोल्हापूर जिह्यातील सर्व वाहतूकदारांची दोन-तीन दिवसांमध्ये बैठक घेऊन पुढील दिशा ठरवली जाईल. शासन, लोकप्रतिनिधी व संबंधित घटकासोबत पाठपुरावा करून आंदोलन केले जाईल, असे लॉरी ऑपरेटरचे अध्यक्ष सुभाष जाधव, उपाध्यक्ष भाऊ घोगळे, सेक्रेटरी हेमंत डिसले, खजानिस प्रकाश केसरकर यांनी माहिती दिला आहे.