Chandrakant Patil | मुख्यमंत्र्यांच्या दूरदृष्टीने कागलचा निर्णय झाला असावा : मंत्री चंद्रकांत पाटील
महायुतीच्या रणनीतीवर मंत्री चंद्रकांत पाटील यांची स्पष्ट भूमिका
गडहिंग्लज : कागल नगरपरिषदेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरदृष्टी ठेवूनच मंत्री हसन मुश्रीफ, शाहू उद्योगाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांची युती केली असावी. मुख्यमंत्री फडणवीस पक्षासाठी चांगलेच करणार असा आशावाद उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गडहिंग्लजच्या दौऱ्यात व्यक्त केला. कागल येथील आघाडीबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता ते बोलत होते.
गडहिंग्लज नगरपरिषदेच्या रिंगणात असणाऱ्या जनता दल, भाजपा, जनसुराज्य, शिवसेना या पक्षांच्या महायुतीच्या प्रचारासाठी मंत्री पाटील आज गडहिंग्लजच्या दौऱ्यावर आले होते. चंदगडला भाजपचेच आमदार असल्याने तेथे स्वतंत्र लढत आहोत. मंत्री मुश्रीफांना चंदगड, कागल येथे भाजपा पाहिजे आहे. पण गडहिंग्लजला नको आहे. जनता दलाबरोबर आघाडी करत निवडणुकीला सामोरे जाऊया असे आवाहन केले.
पण त्याला मंत्री मुश्रीफांनी नकार दिला.त्यामुळे स्थानिक कार्यकर्ते आणि जनतेची इच्छा यामुळे गडहिंग्लजला जनता दलाबरोबर भाजपाने महायुती केल्याचे यावेळी मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, स्वाती कोरी, रमेश रिंगणे, राजेंद्र तारळे, प्रितम कापसे यांच्यासह इतर उपस्थित होते.