For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कडोली मराठी साहित्य संमेलन रविवारी

10:34 AM Jan 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
कडोली मराठी साहित्य संमेलन रविवारी
Advertisement

संमेलन चार सत्रात पार पडणार : तयारी जोरात : रसिकांमध्ये उत्सुकता

Advertisement

वार्ताहर /कडोली

रविवार दि. 7 जानेवारी रोजी होणारे 39 वे कडोली मराठी साहित्य संमेलन चार सत्रात पार पडणार असून संमेलनाची तयारी जोरात सुरू  आहे. कडोली मराठी साहित्य संघ, सांगाती साहित्य अकादमी बेळगाव आणि अक्षरयात्रा दै. तरुण भारत, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवारी 39 वे कडोली मराठी साहित्य संमेलन येथील श्री दूरदुंडेश्वर विरक्त मठाच्या आवारात आयोजिण्यात आले आहे. संमेलन चार सत्रात पार पडणार असून प्रतिवर्षाप्रमाणे  प्रसिद्ध साहित्यिकांचे विचार ऐकायला मिळणार असल्याने रसिकांमध्ये उत्सुकता आहे. पहिल्या सत्रात उद्घाटन होणार असून वारणानगरचे प्रसिद्ध साहित्यिक प्रा. दिनेश पाटील यांचे अध्यक्षीय भाषण होणार आहे. दुसऱ्या सत्रात ठाणे येथील व्याख्याते मा. संदीप कदम यांचे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर व्याख्यान होणार आहे. तिसऱ्या सत्रात नवोदितांचे कथाकथन होणार असून यामध्ये समृद्धी पाटील (बालिका आदर्श विद्यालय, बेळगाव), वैभवी मोरे (बालवीर विद्यानिकेतन, बेळगुंदी) आणि कुशल गोरल (मराठी विद्यानिकेतन, बेळगाव) या कथाकारांचा सहभाग असणार आहे. चौथ्या सत्रात निमंत्रितांचे कविसंमेलन होणार असून यामध्ये डॉ. स्वप्नील चौधरी (देहू, पुणे), मा. प्रशांत केंदळे (नाशिक) आणि गुंजन पाटील (छ. संभाजीनगर) आदी सहभागी होणार आहेत. संमेलन यशस्वी पार पाडण्यासाठी संघाचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. श्री दूरदुंडेश्वर मठाच्या आवारात भव्य शामियाना उभारण्याचे काम सुरू आहे. ग्रंथदिंडी पारंपरिक पद्धतीने पार पाडण्यासाठीही तयारी करण्यात येत आहे.

Advertisement

साहित्यिकांची मांदियाळी

संमेलनाला उपस्थित राहणाऱ्या  साहित्यिकांचा परिचय पुढीलप्रमाणे...

संमेलनाध्यक्ष प्रा. दिनेश पाटील

प्रा. दिनेश पाटील हे वारणानगर (जि.कोल्हापूर) येथील यशवंतराव चव्हाण वारणा विद्यालयात समाजशास्त्र विभाग प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समितीचे ते सदस्य आहेत. अस्पृश्य जाती, दूधपंढरी, आधुनिक भारताचे शिल्पकार महाराजा सयाजीराव गायकवाड, महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या सुधारणा, सर्जक पालवी, जगावेगळा राजा, सयाजीरावांची ओळख असे त्यांचे अनेक ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. अनेक ग्रंथांचे संपादक म्हणून त्यांनी कार्य केले आहे. याबरोबरच त्यांचे अनेक ग्रंथ संशोधनात्मक ग्रंथ प्रकाशित झाले आहेत.

व्याख्याते मा. संदीप कदम

इतिहास अभ्यासक आणि प्रसिद्ध व्याख्याते मा. संदीप कदम हे वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष, जिजाऊ स्टडी अँड रिसर्च सेंटरचे अध्यक्ष आणि निर्धार फाऊंडेशनचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी शिवस्फूर्ती समुहाच्या माध्यमातून दुर्ग संवर्धन व ऐतिहासिक वारसा जतन संवर्धन मोहीम तसेच विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. शिवाय जिजाऊ रिसर्च सेंटर आणि निर्धारच्या माध्यमातून अनेक विषयांवरील साहित्य संकलन आणि संवर्धन, विविध विषयांवर सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले आहे. त्यांनी राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतीराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, त्यागमूर्ती माता रगाई, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, वारकरी संत परंपरा अशा अनेक विषयांवर व्याख्याने दिली आहेत.

कवी  डॉ. स्वप्नील चौधरी

डॉ. स्वप्नील चौधरी हे पेशाने डॉक्टर म्हणून कार्यरत असलेले निमी नेत्रालय मोशी या पुणेस्थित हॉस्पिटलचे संचालक आहेत. युवा कवी म्हणून महाराष्ट्रभर शेकडो काव्य संमेलनांमध्ये निमंत्रित कवी म्हणून सहभागी झाले असून त्यांच्या चल दंगल समजून घेऊ या कवितेने त्यांना मोठी प्रसिद्धी मिळवून दिली. 2016 सालचा महाराष्ट्राचा लोकप्रिय वक्ता म्हणून टाईम्स ऑफ इंडियाचा पुरस्कार तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथे प्रदान करण्यात आला. महापुरुषांचे विचार, सकारात्मकता, वेळेचे नियोजन, वक्तृत्व कौशल्य कसे विकसित करावे? आदी विषयांवर अनेक ठिकाणी व्याख्यानेही झाली आहेत. त्यांना राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेत पारितोषिक विजेतेबरोबर गदिमांचे वारसदार करंडक, विनायकराव पाटील काव्य करंडक, केशवसुत काव्य करंडक अशा नामवंत काव्य स्पर्धांचे विजेतेपद मिळविले आहे.

कवी प्रशांत केंदळे

नाशिक एज्युकेशन सोसायटी संचालित माध्यमिक विद्यालय उंटवाडी येथे सहशिक्षक म्हणून कार्यरत असलेले प्रशांत दत्तात्रय केंदळे यांनी साहित्य क्षेत्रात भरीव कामगिरी करून एक वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांच्या गुलमोहराचं कुंकू या कविता संग्रहाने त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त करून दिले आहेत. त्यांना महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचा ग.दि.मा. पुरस्कार, शब्दवेल साहित्य मंचचा कबीर सन्मान पुरस्कार, पुणे साहित्य मालाचा-माणिक महोत्सव पुरस्कार, मंगळवेढा शब्दकळा साहित्य मंडळाचा शब्दकळा पुरस्कार आदी प्राप्त झाले आहेत. ‘धोंडी’ या मोनिश पवार दिग्दर्शित व सयाजी शिंदे अभिजीत चित्रपटात ‘गुलमोहराचं कुंकू’ या कवितेचा गीत म्हणून समावेश झाला आहे. त्यांनी वृत्तवाहिनीबरोबर अनेक निमंत्रित कार्यक्रमात सहभाग दर्शविला आहे. त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार व सन्मान प्राप्त झाले आहेत. तसेच ते विविध संस्थात सदस्य संयोजक म्हणून कार्य करीत आहेत.

कवयित्री गुंजन पाटील

प्राणीशास्त्रात एमएस्सी पदवी प्राप्त केलेल्या कवयित्री गुंजन पाटील यांना महाविद्यालयीन जीवनापासून कविता लिहिण्याचा छंद होता. त्यामुळे विद्यापीठ युथफेस्टीव्हल, विविध काव्यधारा आणि काव्य संमेलनांतून कविता वाचन करण्याची संधी प्राप्त झाली. रामदास फुटाणेंसोबत पुण्यात आणि मुंबईमध्ये कवितांचे कार्यक्रम केले आहे. शिवाय एबीपी माझा या मराठी चॅनेलवर कविता संमेलनामध्येही सहभाग घेतला आहे. त्यांच्या अनेक कविता युट्युबवर लोकांच्या पसंतीस उतरल्या आहेत.

Advertisement
Tags :

.