कडोली, गौंडवाड, केदनूर परिसराला पावसाने झोडपले
वादळी वारा-विजेचा कडकडाट : विद्युतखांब कोसळल्याने मोठे नुकसान : घरातील विजेची उपकरणे जळून खाक
वार्ताहर /कडोली
विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाने बुधवारी दुपारी कडोली, केदनूर परिसराला झोडपून काढल्याने उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना तसेच पाणीटंचाईने तीव्र उन्हापासून होरपळणाऱ्या पिकांना दिलासा मिळाला आहे. काही ठिकाणी विद्युतखांब उन्मळून पडल्याने कडोली परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. अचानक दुपारी 4 वाजता काही वेळेतच ढगांची जमवाजमव झाली. विजेच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली. कडोली, केदनूर, गुंजेनट्टी, देवगिरी, जाफरवाडी आदी भागात पावसाने हजेरी लावल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना थोडाफार दिलासा मिळाला आहे. तसेच गेल्या सहा महिन्यापासून वादळी पावसाची हजेरी नव्हती. त्यामुळे कडोली परिसरातील शिवारात पाण्याची भीषण टंचाई भासत होती. विहिरींनी तळ गाठला होता. तीव्र उन्हामुळे पिके होरपळून जात होती, अशा परिस्थितीत पावसाने हजेरी लावल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे.
पाण्याच्या टाकीवर वीज कोसळली
आजच्या वादळी पावसाने कडोलीत अनेक ठिकाणी विद्युतखांब कोसळल्याने कडोली परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने तारा तुटल्या आहेत. तसेच कडोलीतील बसवंत शहापूरकर यांच्या घरावरील पाण्याच्या टाकीवर वीज कोसळल्याने पाण्याची टाकी निकामी झाली आहे. घरातील वायरिंगही जळून मोठे नुकसान झाले. गौंडवाडनजीक रस्त्यावर विद्युतखांब उन्मळून पडले आहेत. मुसळधार पावसाने कडोली येथील प्रमुख रस्त्यावर पाणी साचले होते. पाणी निचरा होण्यासाठी सोय नव्हती. त्यामुळे सर्वांची तारांबळ उडाली. या पाण्यातूनच वाहनधारकांची ये-जा होत होती.
कंग्राळी बुद्रुक परिसरामध्ये बुधवारी दुपारी 4 वाजता विजेचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. यामुळे शेतकरी वर्गाची एकच तारांबळ उडाली. परंतु मुसळधार पाऊस पडणार असे चिन्ह दिसत असतानाच एकदम पावसाने उसंत घेतल्यामुळे परत उष्णतेमध्ये वाढ होणार असल्याची चर्चा शेतकरी वर्गातून होत होती. गेले आठ दिवस उष्णतेच्या पाऱ्याने कमालीचा उच्चांक गाठला होता. दिवस-रात्र नागरिक उष्णतेने हैराण होत आहेत. बुधवारी तर उष्णतेचा पारा कमालीचा चढला होता. आज भरपूर पाऊस पडणार असे चिन्ह सकाळपासून जाणवत असलेल्या उष्णतेमुळे वाटत होते. परंतु हलक्या सरीमध्येच पावसाने उसंत घेतल्यामुळे शेतकरी वर्गाला कधी मोठा पाऊस पडणार म्हणून आकाशाकडे पहात राहावे लागणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
2023 मधील पावसाळा कमीचा परिणाम
2023 साली पावसाळा कमालीचा घटला होता. मृग, आर्द्रा वगळता इतर नक्षत्रे कोरडीच गेली. यामुळे भूजल पातळी कमालीची खालावल्याचे दिसून येत आहे. आणि याचाच परिणाम 2024 साली भूजल पातळी कमालीची खाली गेल्यामुळेच उष्णतेमध्ये कमालीची वाढ झाल्याचे दिसून येत आहे, अशीही चर्चा शेतकरीवर्गातून होत आहे.
सध्या मोठ्या अवकाळी पावसाची गरज
पाणी समस्येवर मात करण्यासाठी आता निसर्गानेच चमत्कार करणे गरजेचे आहे. अवकाळी मोठ्या पावसाची सध्या नितांत गरज आहे आणि पावसाळ्यात भरपूर पाऊस पडल्यास कुणालाही पाणी समस्येला सामोरे जावे लागणार नाही, असेही विचार ऐकावयास मिळत आहेत.
उचगाव, बेळगुंदी परिसरात वळिवाची जोरदार सलामी नाहीच
बेळगावच्या पश्चिम भागामध्ये उचगाव, बेळगुंदी परिसरात बुधवारी वळीव पावसाची जोरदार सलामी होईल या आशेत शेतकरी आणि नागरिक असतानाच पावसाचे अवघे थेंब येऊन मोठी निराशा या भागातील जनतेची वरूणराजाने केली. त्यामुळे शेतकरी आणि शेती व्यवसाय अडचणीत आला असून एकंदरीत शेतीचे तंत्रच बिघडल्याची चर्चा शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे. एप्रिल महिन्याचा मध्य आला तरी अद्याप वळीव पावसाने सातत्याने हुलकावणीच दिल्याने या भागातील शेतीची कामे आणि शेतवडीत असलेली पिके पूर्णत: करपून गेली आहेत. याबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मोठा बिकट होत चालला आहे. नदी, नाले, तलाव, सार्वजनिक विहिरीनी सध्या तळ गाठला असून अनेक ठिकाणी हा सर्व भाग कोरडा पडला आहे. यामुळे प्रचंड वाढलेली उष्णता, रखरखते उन्ह या सर्वांमध्ये नागरिक होरपळून चालल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमाराला ढगांनी आकाश दाटून आले होते. जोरदार वाराही सुटला होता. मुसळधार पाऊस होईल असे वाटत असतानाच पावसाने मोठी फसगत केल्याने सर्वांची निराशा झाली.