स्वारगेट अत्याचार प्रकरणी पीडितेबद्दलच्या 'त्या' विधानावर गृहराज्यमंत्र्यांचे वक्तव्य
मंत्री योगेश कदम यांची सारवासारव म्हणाले, आरोपीला वाचविण्याचा...
मुंबई
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी गुरुवारी (२७ फेब्रुवारी) स्वारगेट आगार येथील घटनास्थळी पाहणी केल्यानंतर माध्यमांशी बोलताना बलात्कार पीडितेबाबत असंवेदनशील विधान केले होते. त्यानंतर आता त्यांनी त्यावर त्यांची भूमिका मांडली आहे.
पुण्यातील स्वारगेट बस आगारामध्ये २६ वर्षीय तरुणीवर घडलेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे राज्यासह देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्वारगेट बस डेपोची पाहणी करुन पोलिसांना सूचना दिल्या होत्या.
त्यानंतर या प्रकरणी माध्यामांशी बोलताना त्यांनी पीडितेने प्रतिकार केला नसल्याबाबत विधान केले होते. प्रतिकार झाला असता, तर तिथे बसच्या आजूबाजूला उभ्या असलेल्या लोकांनी घटना रोखली असती, असे विधान केले होते. योगेश कदम यांच्या या विधानावर विरोधकांनी आक्षेप घेतला असून सदर विधान असंवेदनशील असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबद्दल भूमिका मांडली.
आता या संदर्भात योगेश कदम यांनी पत्रकार परिषदे घेत विधानाचा विपर्यास झाला असल्याचे म्हटले आहे.
पत्रकार परिषदेत योगेश कदम म्हणाले, "आमचे सरकार लाडक्या बहिणींचे सरकार आहे. महिला अत्याचाराबाबत झिरो टोलरन्स हे आमचे पहिल्या दिवसापासूनचे धोरण राहिले आहे. गृहराज्यमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक पोलीस आयुक्तांच्या मी स्वतः बैठका घेतलेल्या आहेत. महिला अत्याचार प्रकरणात आरोपीविरोधात कडक कारवाई करा अशी सूचनाही मी दिलेल्या आहेत", असे वक्तव्य योगश कदम यांनी केले.
पुढे कदम म्हणाले, काल मी जे विधान केले, त्याचा विरोधकांकडून विपर्यास केला जात आहे. स्वारगेट आगारात मी जेव्हा घटनास्थाळाची पाहणी करत होतो. तेव्हा मला दिसले की, ती जागा रहदारीची होती. रहदारीचा परिसर असून आमच्या भगिनीवर अत्याचार होत असताना कुणीच कसे मदतीसाठी आले नाही, असा प्रश्न मी पोलिसांना विचारला. त्यांनी मला जे उत्तर दिले, ते मी पत्रकार परिषदेत सांगितले. पण माझ्या विधानाचा विपर्यास करुन त्याचा राजकाराणासाठी वापर होत असेल तर हे दुदैर्वी आहे, असेही योगेश कदम यावेळी म्हणाले.
पुढे योगेश कदम पुढे म्हणाले, 'काल मी म्हटल्या प्रमाणे, आरोपी जेव्हा पकडला जाईल, तेव्हा त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहीजे. त्यामुळे आरोपीला वाचविण्यासाठी मी कोणतेही विधान केलेले नाही. उलट त्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस दोन दिवसांपासून त्याच्या मागावर आहेत. पोलिसांची कारवाई योग्य आहे की नाही, हे पाहण्यासाठी मी घटनास्थळाची पाहणी केली होती. त्यावेळी आरोपीवर कडक कारवाई करा, अशा सूचना देण्यासाठी मी तिथे गेलो होतो.'
'आरोपीला वाचविण्याचा आमचा प्रयत्न होता'. असा झालेला आरोप हा धादांत खोटे आहेत.