कु. कबीर हेरेकर महात्मा गांधी देश सेवा पुरस्काराने सन्मानित
कबीर हा शांतिनिकेतन इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी
ओटवणे | प्रतिनिधी
सावंतवाडी येथील शांतिनिकेतन स्कूलचा इयत्ता तिसरीचा विद्यार्थी कु. कबीर हेरेकर याला बेंगळुरू येथील वेयील फाऊंडेशन ( Veyil Foundation) या संस्थेने महात्मा गांधी जयंतीचे औचित्य महात्मा गांधी देश सेवा पुरस्कार देऊन सन्मानित केले. याबद्दल कबीरला शाळेतून प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.आज सगळे जग हे मोबाईलच्या विळख्यात सापडले असून भावी पिढी ही मैदानी खेळाकडे दुर्लक्ष करत चालली आहे. दिवसभर मोबाईल गेम व रिल्स यात अडकून स्वतःला शारीरिक, मानसिक, भावनिक व सामाजिक दृष्ट्या कमकुवत बनवत चालली आहे. यात कबीर हा समाजासमोर एक वेगळे उदाहरण घेऊन अगदी लहान वयातच अनेकांसाठी प्रेरणा बनलाआहे. अवघ्या ८ वर्षाच्या कबीरने महाराष्ट्र व गोवा राज्यात झालेल्या एकूण १५ मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेतला आहे. बिया गोळा करून त्यांची जंगलात लागवड करणे. टाकाऊ पासून टिकाऊ कुंड्या तयार करणे, घरामध्ये वापरात येणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांपासून इको ब्रिक्स बनवणे, सतत प्राणी रक्षणासाठी धडपड करणे हे कबीरचे वैशिष्ट्य आहे. एवढे सगळे करत असताना देखील सायकलिंग, स्वीमिंग, स्केटिंग अश्या खेळांमध्ये देखील कबीर सहभाग घेत असतो. याच कार्यांची दखल घेत या संस्थेने कबीरला गौरवीले आहे. कबीर पासून प्रेरणा घेऊन इतर मुले देखील मोबाईलच्या विळख्यातून बाहेर पडतील व मैदानी खेळाकडे वळतील अशी अपेक्षा या संस्थेने केली आहे. यावेळी शाळेतील शिक्षकवर्ग श्री. नंदीहळी, श्री वारंग, श्री कुडतरकर, श्री सावळे, श्रीम गोरेटी, श्रीम अमीता, श्रीम गौरी व संगीता मॅडम उपस्थित होते.