कबड्डी संघ पाकला पाठविण्यास नकार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पाकिस्तानमध्ये खेळविल्या जाणाऱ्या आगामी मित्रत्वाच्या कबड्डी मालिकेसाठी भारताने आपला संघ पाठविण्यास स्पष्ट नकार दिला आहे. अलिकडेच भारतीय क्रिकेट संघालाही आयसीसी चॅम्पियन करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी पाकमध्ये जाण्यास भारत शासनाकडून स्पष्ट नकार देण्यात आला होता.
भारत आणि पाक कब•ाr संघामध्ये मित्रत्वाच्या सामन्यांची ही मालिका आयोजित केली होती. या मालिकेत सहभागी होण्यासाठी भारतीय कबड्डी फेडरेशनने शासनाकडे विनंती केली होती. पण भारतीय शासनाकडून ही विनंती फेटाळण्यात आली. बऱ्याचवर्षांपासून भारत आणि पाक यांच्यातील क्रीडा संबंध पूर्णपणे ठप्प झाले आहेत. या दोन देशातील राजकीय परिस्थिती नेहमीच तणावग्रस्त असल्याने भारतीय संघ पाकिस्तानमध्ये पाठविला जात नाही. 2008 साली झालेल्या आशिया चषक स्पर्धेत भारताचा संघ पाकमध्ये दाखल झाला होता. त्यानंतर उभय संघातील क्रीडा संबंध पूर्णपणे बंद झाले आहेत. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मुल्तान आणि लाहोर येथे होणाऱ्या अंधांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघ पाठविला जाण्याची शक्यता दुरावली आहे.