For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कबड्डी : भारताची दुहेरी मुकुटाकडे वाटचाल

06:35 AM Sep 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
कबड्डी   भारताची दुहेरी मुकुटाकडे वाटचाल
Advertisement

पुरुष आणि महिला संघ अंतिम फेरीत 

Advertisement

वृत्तसंस्था, नागोया : भारतीय कबड्डी संघांनी दमदार कामगिरी करत पुरुष आणि महिला अशा दोन्ही गटांत अंतिम फेरी गाठली आहे. उपांत्य फेरीतील विजयामुळे भारताची दोन्ही संघांमध्ये किमान रौप्यपदके निश्चित झाली असून, आता आज शनिवारी होणाऱ्या सुवर्णपदकाच्या सामन्यात भारताचे लक्ष्य विजेतेपदावर असेल.

भारतीय महिला संघाने उपांत्य फेरीत नेपाळचा 48-24 असा पराभव केला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच भारतीय खेळाडूंनी आक्रमक खेळ करत वर्चस्व राखले. पूर्वार्धात भारताने 31-17 अशी आघाडी घेतली होती. भारतीय रेडर्सच्या प्रभावी कामगिरीसोबत बचावफळीनेही भक्कम खेळ करत नेपाळवर सातत्याने दबाव ठेवला. उत्तरार्धात भारतीय संघाने आपली आघाडी आणखी मजबूत केली. संजू देवीने रेडिंगमध्ये महत्त्वाचे योगदान दिले, तर भारतीय बचावफळीने नेपाळच्या रेडर्सना फारशा संधी दिल्या नाहीत. भारताने सामन्यात तीन ऑलआउट मिळवत अखेर 24 गुणांच्या फरकाने विजय नोंदवला. महिलांनी 4 बोनस गुणही मिळविले.

Advertisement

पुरुष संघाची थायलंडवर मात

महिला संघाच्या विजयानंतर भारतीय पुरुष संघानेही उपांत्य फेरीत थायलंडविरुद्ध प्रभावी कामगिरी केली. भारताने थायलंडचा 66-28 असा मोठ्या फरकाने पराभव करत अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित केला. सामन्याच्या मध्यंतराला भारताकडे 37-18 अशी भक्कम आघाडी होती.

भारतीय रेडर्सनी सातत्याने गुण मिळवत थायलंडच्या बचावफळीवर दबाव निर्माण केला. देवांक दलाल आणि अर्जुन देशवाल यांनी आक्रमणात महत्त्वाची भूमिका बजावली. भारताने सामन्यात 15 बोनस गुण मिळवले, तर थायलंडला केवळ पाच बोनस गुण मिळवता आले. भारतीय बचावफळीनेही थायलंडच्या रेडर्सना रोखत सामना एकतर्फी केला. या सामन्यात भारताने 15 बोनस गुण मिळविले.

दोन्ही संघांसमोर आता इराणचे आव्हान

उपांत्य फेरीतील विजयामुळे भारतीय पुरुष आणि महिला संघ अंतिम सामन्यात पोहोचले आहेत. दोन्ही गटांच्या दुस्रया उपांत्य सामन्यात इराणने चायनीज तैपेईचा पराभव केल्याने भारताच्या पुरुष आणि महिला संघांची सुवर्णपदकासाठी इराणशीच लढत होणार आहे. दोन्ही अंतिम सामने 26 सप्टेंबरला खेळवले जाणार आहेत.

महिला कबड्डीचा सुवर्णपदकाचा सामना सकाळी, तर पुरुषांचा सामना दुपारी होणार आहे. भारतीय महिला संघ 2010 मध्ये महिला कबड्डीचा समावेश झाल्यापासून प्रत्येक एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकत आला आहे. पुरुष संघानेही एशियन गेम्समध्ये आतापर्यंत आठ सुवर्णपदके जिंकली आहेत. 2018 मध्ये मात्र इराणने सुवर्णपदक पटकावले होते.

या पार्श्वभूमीवर नागोया येथे होणारे भारत-इराण अंतिम सामने विशेष महत्त्वाचे ठरणार आहेत. दोन्ही भारतीय संघांनी उपांत्य फेरीपर्यंतची आपली अपराजित मोहीम कायम ठेवली असून, आता एशियन गेम्समध्ये दुहेरी सुवर्णपदक मिळवण्याच्या दिशेने भारताचे पाऊल पडले आहे.

Advertisement
Tags :

.