के. संजय मूर्ती यांनी स्वीकारली ‘कॅग’ची सूत्रे
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
माजी उच्च शिक्षण सचिव के. संजय मूर्ती यांनी गुऊवारी भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (सीएजी) म्हणून पदभार स्वीकारला. ते हिमाचल प्रदेश केडरच्या भारतीय प्रशासकीय सेवेचे (1989 बॅच) अधिकारी आहेत. ते गिरीश चंद्र मुर्मू यांच्यानंतर ‘कॅग’चा पदभार स्वीकारत आहेत. केंद्र सरकारने मूर्ती यांची सोमवारी नवीन पॅग प्रमुख म्हणून नियुक्ती केली होती. राष्ट्रपती भवनातील एका कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मूर्ती यांना भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (सीएजी) म्हणून शपथ दिली. या शपथविधी सोहळ्याला उपराष्ट्रपती जगदीप धनखड, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि वाणिज्य-उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
के. संजय मूर्ती हे यापूर्वी शिक्षण मंत्रालयात उच्च शिक्षण विभागाचे सचिव होते. त्यांनी गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयात अतिरिक्त सचिव आणि राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे सीईओ आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयात सहसचिव म्हणूनही काम केले आहे. केंद्रातील कार्यकाळापूर्वी मूर्ती यांनी हिमाचल प्रदेशमध्ये महत्त्वाच्या पदांवर काम केले होते. त्यांना प्रशासकीय, सामाजिक, आर्थिक आणि पायाभूत सुविधा क्षेत्रांचा मोठा अनुभव आहे.