के. आर. शेट्टी संघाने सिगन चषक पटकाविला
राहुल शिंदे सामानावीर, अभी भोगण मालिकावीर
क्रीडा प्रतिनिधी/बेळगाव
सिगन स्पोर्टस क्लब आयोजित सिगन चषक आंतर क्लब टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात के. आर. शेट्टी संघाने वनश्री क्रिकेट क्लबचा 68 धावांनी पराभव करून सिगन चषक पटकाविला. राहुल शिंदे सामनावीर तर अभी भोगण याला मालिकावीराने गौरविण्यात आले.
एस. के. ई. प्लॅटेनियम ज्युबली मैदानावरती खेळविण्यात आलेल्या अंतिम सामन्यात के. आर. शेट्टी संघाने प्रथम फलंदाजी करताना 19.4 षटकात सर्व गडी बाद 114 धावा केल्या. त्यात राहुल शिंदेने 4 चौकारासह 30, गुरुप्रसाद पोतदारने 1 षटकार 2 चौकारसह 28, गिरीष नाडकर्णीने 13 तर सुनील सक्रीने 11 धावा केल्या. वनश्री क्रिकेट क्लबतर्फे आनंद गुणकीने 21 धावात 3, डॉ. मोहन बस्मे 27 धावात 3, शंकर डी. 14 धावात 2 तर बसवराज के. एम. ने 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना वनश्री क्रिकेट क्लब संघाचा डाव 13.5 षटकात सर्वगडी बाद 42 धावात आटोपला. त्यात बसवराज के. एम. ने 1 चौकारासह 10 धावा केल्या. त्याच्या व्यक्तिरित एकही फलंदाज दुहेरी धावा काढू शकला नाही. के. आर. शेट्टीतर्फे रब्बानी दफेदारने 2.5 षटकात 1 निर्धाव 2 धावा देऊन महत्त्वाचे 3 गडी बाद केले. मिलिंद बेळगावकरने 9 धावात 3, राहुल शिंदेने 14 धावात 3 गडी बाद केले. तर सुनील सक्रीने 1 गडी बाद केला. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे वीरेश किडसण्णवर, प्रणय शेट्टी, रमेश पट्टणशेट्टी, कृष्णा धारामठ, सुनील सक्री व राघवेंद्र, आयोजक विजय कुरी आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या के. आर. शेट्टी व उपविजेत्या वनश्री संघाला चषक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. अंतिम सामन्यातील सामनावीर राहुल शिंदे के. आर. शेट्टी, उत्कृष्ट गोलंदाज मिलिंद बेळगावकर के. आर. शेट्टी तर मालिकावीर अभी भोगण ब्ल्यू स्टार यांना चषक देऊन गौरविण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सिगन स्पोर्टस क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.