के . पी . पाटील सभासदांच्या विश्वासास पात्र; पालकमंत्री हसन मुश्रीफ
कागल येथे बिद्री कारखान्याच्या नूतन संचालकांचा सत्कार
कागल : प्रतिनिधी
सहकारात एखाद्या व्यक्तीवर लोकांनी विश्वास टाकला की ती व्यक्ती विश्वास पात्र असेल तर लोक कसलेही आमिष, राजकीय समिकरण झुगारून देतात. के.पी. पाटील हे सभासदांच्या विश्वासास पात्र ठरले आहेत. लोकांचा के. पी. पाटील यांचेवर असलेले प्रेम यातून सिध्द होते. असे प्रतिपादन जिह्याचे पालकमंत्री असेल मुश्रीफ यांनी केले. येथील गैबी चौकात बिद्री साखर कारखान्यात निवडून आलेल्या नूतन संचालकांचा सत्कार पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याहस्ते करण्यात आला.यावेळी ते बोलत होते.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, नवीन संचालकांच्या समोर मोठ्या अडचणी आहेत. कर्मच्रायांचे प्रश्न आहेत. ते सोडविण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत. आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू. के. पी. पाटील यांनी नेहमी ऊस उत्पादकांना जादा दर देण्याचे काम केले. मागील वेळच्या निवडणुकीत आमदार सतेज पाटील त्यांनी आपला उमेदवार दिला होता. पण दिनकरराव जाधवांचे पॅनेल आमच्या विरोधात असल्याने ते करवीरमध्ये प्रचाराला फिरले नाहीत. यावेळी त्यांनी निवडणूक हातातच घेतली. मी मंत्री असल्याने बिद्रीच्या निवडणूकीची धुरा सतेज पाटील यांचेकडे सोपविली होती.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, आता आम्ही आजरा साखर कारखान्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. आजरा कारखान्याची निवडणूक आपण, सतेज पाटील आणि आमदार विनय कोरे एकत्र बसून बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला. पण आता राष्ट्रवादीचे पॅनेल तेथे उभे आहे. आता के. पी. पाटील यांनी आम्हाला वेळ द्यावा. लवकरच हा कारखाना आर्थिक अडचणीतून सावरून दाखवू.
माजी आमदार के. पी पाटील म्हणाले, मला चेअरमनच नव्हे तर दोन वेळा आमदार करण्यामध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांनी माझ्या मागे मोठी ताकद उभी केली. निवडणुकीत विरोधकांनी केलेल्या आरोपांना कारखान्यात चांगले काम करून याचे उत्तर देऊ. मी आयुष्यभर हसन मुश्रीफ यांची साथ सोडणार नाही.
स्वागत संजय चितारी व प्रास्ताविक दत्ता पाटील यांनी केले. आभार नवीद मुश्रीफ यांनी मानले. यावेळी युवराज पाटील, अरुण डोंगळे, सुनिलराज सुर्यवंशी, राहूल देसाई, अंबरिशसिंह घाटगे, रविंद्र पाटील आदींसह नूतन संचालक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आता लक्ष्य विधानसभा....
येत्या विधानसभा निवडणुकीत कोण उमेदवार मला माहित नाही. पण एक सांगतो मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, दिनकरराव जाधव, आर. के. मोरे, राहूल देसाई या सर्वांच्या सहकार्यातून महायुतीला जादा आमदार पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला सर्वांनी ताकद देण्याची गरज आहे. हे लक्ष्य ठेऊन आम्ही काम करू. साखर कारखाना तर चांगला चालवूच पण बड्याबड्यांनी केलेल्या आरोपाला कारखान्याच्या कारभारातून चोख उत्तर आम्ही देऊ, असे माजी आमदार के. पाटील यांनी सांगितले.