For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘के. बी. लेगसी’ प्रदर्शनाचे थाटात उद्घाटन

11:24 AM Feb 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
‘के  बी  लेगसी’ प्रदर्शनाचे थाटात उद्घाटन
Advertisement

वरेरकर नाट्या संघ येथे के. बी. कुलकर्णी जयंती कार्यक्रम : अरुण दाभोळकर यांना जीवनगौरव-शिरीष देशपांडे यांना कलागौरव पुरस्कार प्रदान 

Advertisement

बेळगाव : कलेच्या शिक्षणातून उपजीविका कशी करता येईल याचा विचार कलाकारांनी करावा. तसेच आपली कला इतरांपेक्षा वेगळी कशी होईल, यावर भर देऊन कलेचे सर्व प्रकार हाताळावेत, असे मत प्रसिद्ध चित्रकार सुहास बहुलकर यांनी व्यक्त केले. कलामहर्षि के. बी. कुलकर्णी जयंती कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. मंगळवार दि. 4 रोजी सकाळी वरेरकर नाट्या संघामध्ये हा कार्यक्रम झाला. व्यासपीठावर संघाचे कार्याध्यक्ष जगदीश कुंटे, चित्रकार विक्रम परांजपे, शिरीष देशपांडे, प्रा. एस. वाय. प्रभू, चित्रकार अरुण दाभोळकर, साधना बहुलकर व शिरीष कुलकर्णी उपस्थित होते.

सुहास बहुलकर म्हणाले, चित्रकारांनी व शिल्पकारांनी वाचन केलेच पाहिजे. कोणताही कलाप्रकार आत्मसात करणे सोपे नाही. चित्रकलेला विषयांची मुबलकता प्रचंड आहे. कलेचा इतिहास पाहता निसर्ग, व्यक्ती व स्थिर चित्रण यातून प्रसंग चित्रण निर्माण करता आले पाहिजे. स्थिर चित्रणामध्ये प्रयोगशीलता, अभिव्यक्ती यांना महत्त्व द्यायला हवे. आजच्या चित्रकलेच्या विद्यार्थ्यांनी चित्रकलेवरील पुस्तकांचे वाचन करणे आवश्यक आहे. त्यांनी चित्रकलेचे सर्व प्रकार हाताळायला हवेत. त्याचबरोबर स्वत: लेखन करणे, नोंदी काढणे महत्त्वाचे आहे. लेखनामुळे आपली इतिहास परंपरा समजते. शिक्षकांनी ती आत्मसात केली तर विद्यार्थ्यांनासुद्धा त्यापासून प्रेरणा मिळते, असे ते म्हणाले.

Advertisement

यावेळी के. बी. कुलकर्णी यांच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये जमिनीवर बसून के. बी. चित्र कसे पाहत होते, याची आठवण त्यांनी दिली. तसेच जीवनगौरव पुरस्कारप्राप्त अरुण दाभोळकर व कलागौरव पुरस्कारप्राप्त शिरीष देशपांडे यांच्या चित्रकलेचे वैशिष्ट्या सांगून त्यांचे अभिनंदन केले. प्रारंभी सुहास बहुलकर यांच्या हस्ते ‘के. बी. लेगसी’ या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व के. बी. कुलकर्णी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक जगदीश कुंटे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय अश्विनी ओगले यांनी करून दिला. त्यांचा सत्कार प्रा. एस. वाय. प्रभू यांनी केला.

यावेळी अरुण दाभोळकर यांना जीवनगौरव पुरस्कार व शिरीष देशपांडे यांना कलागौरव पुरस्कार देण्यात आला. मानपत्राचे वाचन विद्या देशपांडे यांनी केले. यावेळी अरुण दाभोळकर यांनी चित्रकाराच्या चित्रांमधून त्याचे काम बोलते आणि रसिकांचा प्रतिसाद महत्त्वाचा असतो, असे सांगितले. शिरीष देशपांडे यांनी हा कलेचा व कलाकारांचा गौरव असून कुटुंबाचा पाठिंबा मोलाचा असल्याचे सांगितले. विक्रम परांजपे यांनी बेळगाव म्हणजे एक मोठी शाळा आहे. पारंपरिक की समकालीन या वादापेक्षा हे दोन प्रवाह जिवंत ठेवणे महत्त्वाचे आहे. एस. वाय. प्रभू यांनी विचार ठामपणे सांगण्यासाठी चित्रकला हे माध्यम महत्त्वाचे असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन माधव कुंटे यांनी केले. आभार स्मिता कुलकर्णी यांनी मानले. बुधवार दि. 5 रोजी सकाळी 11 वाजता सुहास बहुलकर यांचे तर दुपारी 3 वाजता विक्रम परांजपे चित्रकलेचे प्रात्यक्षिक दाखविणार आहेत.

स्पर्धेचे बक्षीस वितरण

यानिमित्त घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरणही याचवेळी करण्यात आले. या स्पर्धेत 1) रोशन लोहार, 2) कशिष अडसूळ, 3) सौंदर्या बनसोडे, उत्तेजनार्थ सोनाली पवार, स्वप्नील वाघमारे, अनमोल दोडमनी, श्रीदेवी शिवनगेकर यांना बक्षिसे देण्यात आली. परीक्षक म्हणून बाळू सदलगे व उत्तम साठे यांनी काम पाहिले. या कार्यक्रमात देणगीदारांचाही सत्कार करण्यात आला.

आर्ट स्कूलला पुस्तके भेट

सुहास बहुलकर व साधना बहुलकर यांनी आपली पुस्तके आर्ट स्कूलला दिली.तसेच राष्ट्रपती भवनसाठी सुहास बहुलकर यांनी काढलेल्या लोकमान्य टिळक यांच्या चित्राची प्रतिकृती लोकमान्य ग्रंथालयासाठी देण्याचे जाहीर केले.

Advertisement
Tags :

.