Navratri 2025 Jotiba Temple: अलोट गर्दीत जोतिबाचा धुपारती सोहळा, भक्तिमय वातावरणात धार्मिक विधी
भक्तांनी मंगलमय व भक्तीमय वातावरणात श्री चे दर्शन, पूजा-अर्चा व धार्मिक विधी केले
जोतिबा डोंगर : महाराष्ट्र, कर्नाटकचे कुलदैवत दख्खनचा राजा श्री क्षेत्र जोतिबा डोंगर येथील नवरात्रोत्सवात मंगळवारी दुसऱ्या दिवशी श्री जोतिबा देवाच्या दर्शनाबरोबरच धुपारती सोहळा व लवाजमा सोहळ्यास भक्तांची प्रचंड गर्दी झाली होती. दुसऱ्या माळेनिमित्त श्री जोतिबा देवाची सोहन कमळातील तीन पाकळ्यांमधील (खडी) सुवर्णालंकारीत महापूजा बांधण्यात आली होती.
यावेळी भाविक भक्तांनी मंगलमय व भक्तीमय वातावरणात श्री चे दर्शन, पूजा-अर्चा व धार्मिक विधी केले. दरम्यान मंगळवारी जोतिबाचा धुपारती सोहळा यमाईला जात असताना सोहळ्यात सर्वात पुढे जोतिबा देवाचा मानाचा घोडा, पाठोपाठ उंट त्यानंतर जोतिबाचे पुजारी, देवसेवक, मधुकर शिंदे मानाचे म्हालदार, चोपदार, वाजंत्री, ढोली, डवरी दिवटे, मानाचे हुद्देवाले, कंचाळ वादक देवस्थान समिती, सिंधिया ट्रस्टचे अधिकारी, कर्मचारी, राजेशाही पोशाखात दाखल होते.
तसेच डवरी, ग्रामस्थ, नवरात्र उपासक, भक्तगण या लव्याजम्यात सहभागी झाले होते. यावेळी धुपारती सोहळ्यात रुढी परंपरेनुसार सजवलेला उंट, घोडा आदी लव्याजम्यासह निघालेली शाही मिरवणूक सर्वांचे खास आकर्षण ठरली. श्रींच्या दरबारात उंट, घोडा यांना मानाचे स्थान आहे.
सोहळ्याचे ठिकठिकाणी जंगी स्वागत करून फुलांचा वर्षाव करण्यात आला. ठिकठिकाणी सुवासिनींनी सडा रांगोळी घालून धुपारती सोहळ्याचे पाणी घालून पंचारती ओवाळून स्वागत केले. दरम्यान, पहाटे घंटानाद करून मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. त्यानंतर श्रींची पाद्यपूजा व काकड आरती करण्यात आली.
त्यानंतर श्री सह सर्व देवांना महाभिषेक करून आकर्षक महापूजा बांधण्यात आली. त्यानंतर धार्मिक विधी, मंत्रोच्चार करून महानैवेद्य दाखवून धुपारती करण्यात आली. दहा वाजता यमाईकडे धुपारती, लवाजमा सोहळा गेला. लवाजमा परत आल्यानंतर जोतिबा मंदिरात तोफेची सलामी देण्यात आली.
त्यानंतर त्रिकाळ आरती करून अंगारा वाटप करण्यात आला. रात्री मंदिरात भजन व भावगीतांचा कार्यक्रम करण्यात आला. जोतिबा देवस्थान समिती , जोतिबा पुजारी समिती , कोडोली स. पो. नि. कैलाश कोडग , दहा गावकर प्रतिनिधी व दर्शन रांगेवर नियंत्रण ठेवण्यासाठी कार्यरत होते, तर या नवरात्रोत्सवात तेल, नारळ, पुजा साहित्य, मेवा मिठाई, गुलाल खोबरे खरेदी करण्यासाठी भाविकांची दुकानात मोठी गर्दी दिसत होती.
कमळपुष्प पाकळ्यामधील राजेशाही रुपातील महापूजा नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या माळेनिमित्त श्री जोतिबाची सुवर्णालंकारित कमळपुष्प पाकळ्यामधील राजेशाही रुपातील आकर्षक महापूजा बांधण्यात आली होती. ही पूजा श्री चे पुजारी विशाल ठाकरे, अंकुश दादर्णे गणेश दादर्णे, प्रवीण कापरे, अजित भंडारे, उमेश शिंगे, गणेश बुणे, शिवाजी दादर्णे, महादेव झुगर, विनोद मिटके, हरिदास सातार्डेकर, अविनाश कापरे, दिपक भिवदर्णे श्रीचरण कापरे यांनी बांधली होती.
काळभैरव यमाई चोपडाई महादेव नंदी या देवांची महापूजा केदार चिखलकर, तुषार झुगर केदार शिंगे स्वप्निल दादर्णे, संग्राम सांगळे, चेतन भोरे सतीश मिटके, अजित बुणे सौरभ सांगळे, सचिन ठाकरे, जयदिप आमाणे, अशोक मिटके, सुमित भिवदर्णे, रघुनाथ ढोली, रोहन सांगळे, कैलास ठाकरे प्रविण झुगर यांनी बांधली.