ज्योती येराजीला सुवर्णपदक
वृत्तसंस्था/तैपेई सिटी
शनिवारी येथे झालेल्या तैवान खुल्या अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताची महिला धावपटू तसेच आशियाई चॅम्पियन ज्योती येराजीने 100 मी. अडथळ्याच्या शर्यतीत दर्जेदार कामगिरी करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. अलिकडच्या कालावधीत ज्योतीचे हे चौथे सुवर्णपदक आहे.
महिलांच्या 100 मी. अडथळा शर्यतीमध्ये ज्योतीने 12.99 सेकंदांचा अवधी घेत सुवर्णपदक मिळविले. जपानच्या आसुका टेरेडाने 13.04 सेकंदाचा अवधी घेत रौप्य पदक तर जपानच्या कियो यामाने 13.10 सेकंदाचा अवधी घेत कांस्यपदक मिळविले. 29 मे रोजी दक्षिण कोरियात झालेल्या आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत 25 वर्षीय ज्योती येराजीने 12.96 सेकंदाचा अवधी घेत सुवर्णपदक मिळविले होते. ज्योतीने या क्रीडा प्रकारात 12.78 संकांदाचा राष्ट्रीय विक्रम नोंदविला आहे.
तैवान अॅथलेटिक्स स्पर्धेत पुरुषांच्या 110 मी. अडथळ्याच्या शर्यतीत भारताच्या तेजस शिरसेने सुवर्णपदक मिळविताना 13.52 सेकंदाचा अवधी घेतला. तैपेईच्या केईने 13.72 सेकंदांचा अवधी घेत रौप्य तर तैपेईच्या चेनने 13.75 सेकंदांचा अवधी घेत कांस्यपदक मिळविले. या स्पर्धेत भारताच्या अब्दुल्ला अबुबाकरने पुरुषांच्या तिहेरी उडीत तसेच पूजाने महिलांच्या 1500 मी. धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदके मिळविली आहेत.