For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ज्योती तोरसकर यांची सागरी किल्ले ,पर्यटन विषयात डॉक्टरेट

05:17 PM Mar 20, 2025 IST | अनुजा कुडतरकर
ज्योती तोरसकर यांची सागरी किल्ले  पर्यटन विषयात डॉक्टरेट
Advertisement

मालवण /प्रतिनिधी
मालवण स्थित इतिहास अभ्यासक सौ.ज्योती बुवा तोरसकर या शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर येथून, "सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी किल्ले:इतिहास आणि पर्यटन" या विषयात गेली आठ वर्षे संशोधन करीत होत्या. त्यांनी संबंधित विषयाचा सखोल अभ्यास, सर्वेक्षण आणि संशोधन करून विद्यापीठाकडे आपला शोध प्रबंध सादर केला होता. शिवाजी विद्यापीठाने त्यांच्या संशोधन याला मान्यता देऊन संबंधित विषयात विद्यावाचस्पती अर्थांत पीएचडी ही पदवी काल दिनांक.१९ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदान केली आहे. कोल्हापूर विद्यापीठात काल रोजी झालेल्या मौखिक परीक्षेमध्ये गोवा विद्यापीठाचे डॉ. श्री. रोहित फालगावकर तसेच हातकणंगले येथील श्री अण्णासाहेब डांगे महाविद्यालयचे इतिहास विभाग प्रमुख डॉ.श्री.निरंजन कुलकर्णी व ज्योती बुवा तोरसकर यांच्या मार्गदर्शक प्रा.डॉ.कविता गगराणी यांच्या समितीने ही मौखिक परीक्षा घेतली, आणि या विषयासंदर्भात सखोल चर्चा करून या प्रबंधाला मान्यता दिली.प्रबंधातील विषयांमध्ये सिंधूदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग, देवगड, सर्जेकोट, राजकोट, पद्मगड,सिंधुदुर्ग, किल्ले निवती, यशवंतगड या किनारकोट आणि जलदुर्गांचा प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक कालखंडातील इतिहास मांडला आहे. ऐतिहासिक पर्यटन आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकंदर पर्यटनाच्या सद्यस्थितीचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला आहे. जलदुर्ग आणि किनारकोटांच्या परिसरातील स्थानिकांची या किल्ल्यांबाबत असलेली जाणीव जागृती, त्यांचा पर्यटनावर आधारित विकास, पर्यटनामुळे निर्माण झालेल्या रोजगार संधी, तसेच त्यांच्या सामाजिक सांस्कृतिक जीवनात झालेले बदल, यांचे प्रश्नावलीच्या माध्यमातून डॉ ज्योती यांनी सर्वेक्षण करून त्याचे निष्कर्ष या प्रबंधात मांडले आहेत, त्याचा उपयोग स्थानिक स्वराज्य संस्था, पुरातत्व खाते, शासकीय विभाग, पर्यटन आणि इतिहास तज्ञ यांना सागरी किल्ले विकासासाठी कालबद्ध विकास आराखडा तयार करण्यासाठी होणार आहे. सागरी किल्ले जतन आणि संवर्धन करून, पर्यटन व्यवसायात सागरी किल्ले महत्त्वाची भूमिका बजावतात, त्यामुळे डॉ बुवा यांनी सुचविलेल्या भविष्यातील जतन संवर्धन तसेच पर्यटन वाढीबाबत उपाययोजना आणि शिफारसी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा आणि मराठी सागरी सत्तेचा महत्वाचे अंग असलेले सागरी किल्ले व आरमार हे संपूर्ण जगासाठी आजही अभ्यासाचा विषय आहे. तोच इतिहासाचा धागा पकडून, त्याची सांगड प्रचंड रोजगार तसेच अर्थ निर्मिती करणाऱ्या पर्यटनाशी घालून डॉ ज्योती बुवा तोरसकर यांनी सिंधुदुर्ग मधील सागरी किल्ले इतिहास व पर्यटन हा बहुविद्याशाखीय विषय पीएचडी साठी निवडला हे या संशोधनाचे वेगळेपण बहिस्थ परीक्षक डॉ. रोहित फालगावकर यांनी आपल्या मनोगतात अधोरेखित केले. सदर विषय आणि अनेक ग्रंथालये , गॅझेटियर, मोडी लिपीतील ऐतिहासिक कागदपत्रे, पोर्तुगाल, लिस्बन सारख्या अर्काइव्हज मधून मिळविलेले अस्सल नकाशे, पुस्तके इत्यादी संदर्भ साधनांचा वापर करून केलेल्या सखोल आणि समाजोपयोगी संशोधनाबाबत विद्यापीठ परीक्षण समितीने समाधान व्यक्त केले आणि कौतुक केले. त्याचबरोबर या संशोधनातून सर्वपरिचित किल्ले सिंधुदुर्ग व विजयदुर्ग बरोबरच इतर सहा किल्ल्याचा दुर्लक्षित इतिहास जगासमोर आला आहे, त्याचबरोबर जलदुर्ग पर्यटन बाबत नोंदविलेला अभ्यास भविष्यातील ऐतिहासिक पर्यटन वाढीसाठी, धोरण निर्मितीसाठी एक रोडमॅप , मैलाचा दगड ठरणार आहे, असे निरीक्षण परीक्षण समितीने नोंदविले.

Advertisement

ज्योती बुवा तोरसकर यांच्या शोध निबंध मौखिक परीक्षण अर्थात ओपन डिफेन्स साठी विद्यापीठातील इतिहास विभागाचे प्राध्यापक इतिहास अभ्यासक, एम आणि पीच डी चे विद्यार्थी, मराठी विभाग प्रमुख रणधीर शिंदे, किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती चे श्री.हेमंत वालकर,श्री.भाऊ सामंत,श्री.रविकिरण तोरसकर व कुटुंबीय उपस्थित होते. उपस्थितांनी ज्योती यांच्या पॉवरपॉइंट सादरीकरण झाल्यावर खुल्या प्रश्न उत्तर चर्चेत भाग घेतला व अधिक माहिती जाणून घेतली तसेच काही सूचना केल्या. यावेळी डॉ ज्योती यांनी आपल्या संशोधनासाठी मार्गदर्शक आणि सहाय्यभूत ठरलेल्या सर्वांचे आभार व्यक्त केले. सादरीकरणासाठी स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय येथे कार्यरत असलेल्या प्राध्यापिका डॉ.सुमेधा नाईक यांचे विशेष सहकार्य लाभले. शिवाजी विद्यापीठातील इतिहास विभागात हे परीक्षण पार पडले, यासाठी इतिहास विभाग प्रमुख डॉ. अवनीश पाटील आणि तेथील सर्व स्टाफचे सहकार्य लाभले. इतिहासाबरोबरच पर्यटन दृष्टिकोनातून केलेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी किल्ल्यांचे हे पहिलेच बहुविद्याशाखीय संशोधन ठरले असून त्यामध्ये पीएचडी मिळविलेल्या अ.शि. देसाई टोपीवाला हायस्कूल,मालवण येथे सहा.शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या डॉ ज्योती बुवा तोरसकर यांचे सर्व स्तरातून कौतुक आणि अभिनंदन होत आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.