ज्योती सुरेखा व्हेनामला कांस्यपदक
वृत्तसंस्था / नेनजिंग (चीन)
विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत भारताची महिला तिरंदाजपटू ज्योती सुरेखा व्हेनामने कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात कांस्यपदक मिळवून नवा इतिहास घडविला. या प्रतिष्ठेचे स्पर्धेत कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात पदक मिळविणारी ज्योती सुरेख व्हेनाम ही भारताची पहिली महिला कंपाऊंड तिरंदाजपटू ठरली आहे.
ज्योती सुरेख व्हेनामने आशियाई क्रीडा स्पर्धेत या क्रीडा प्रकारात विद्यमान विजेती म्हणून ओळखली जाते. विश्व तिरंदाजी स्पर्धेत सहभागी होताना 29 वर्षीय ज्योतीने ब्रिटनच्या इला गिब्सनचा 150-145 असा पराभव करुन कांस्यपदक पटकाविले. कंपाऊंड तिरंदाजी क्रीडा प्रकारातील अंतिम फेरीत एकूण 8 स्पर्धकांचा समावेश होता. या स्पर्धेत ज्योती सुरेखा व्हेनामने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत अमेरिकेच्या अॅलेक्सिस रुईझचा 143-140 असा पराभव करत उपांत्य फेरीत स्थान मिळविले होते. विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत ज्योतीने तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. ज्योतीने यापूर्वी 2022 आणि त्यानंतर 2023 च्या विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत आपला सहभाग दर्शविला होता पण तिला या दोन्ही स्पर्धांमध्ये पहिल्याच फेरीत पराभूत व्हावे लागले होते. चीनमधील या स्पर्धेत भारताच्या मधुरा धामणगावकरला पहिल्याच फेरीत मेक्सीकोच्या बर्नेलने 145-142 असे पराभूत केले तर पुरूषांच्या कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात आता भारताच्या ऋषभ यादवचा पहिल्या फेरीतील सामना द.कोरियाच्य जाँगहूशी होणार आहे.