आम्ही न्यायासाठी लढलो पण...साक्षी मलिकला अश्रू अनावर; निवृत्तीची घोषणा
भारतीय कुस्तीगीर महासंघाच्या झालेल्या निवडणुकीत माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांचा विश्वासू मानल्या जाणाऱ्या संजय सिंह हे विजय झाले आहेत. त्यांच्या या विजयाने ब्रिजभुषण सिंह यांचाच विजय सिद्ध झाल्याने ऑलिम्पिक पदक विजेती आणि कुस्तीपटू साक्षी मलिक यांनी आपली स्वेच्छा निवृत्ती घोषित केली.
कुस्तीगीर परिषदेची निवडणूक आज पार पडली यामध्ये संजय सिंग यांनी बाजी मारली आहे. ब्रिजभूषण शरण सिंग यांचे विश्वासू मानल्या जाणाऱ्या संजय सिंह यांनी आपल्या विरोधी आणि महिला आंदोलकांचे समर्थक असलेल्या अनिता शेओरान यांना पराभूत केले आहे. अनिता शेओरान या राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेत्या असून त्यांना फक्त 7 मते मिळाली आहेत.
उत्तर प्रदेशातील भाजपचे सहा वेळा खासदार राहिलेले ब्रिजभूषण शरण सिंग हे 12 वर्षे कुस्तीगीर परिषदेचे प्रमुख होते. गेल्या वर्षभरापासून महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचा आरोप त्यांच्यावर सातत्याने केला जात आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात महिला कुस्तीपटूंनी आंदोलन उभारले होते. त्यानंतर क्रिडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी कुस्तीगीर परिषदेच्या निवडणूकीमध्ये ब्रिजभुषण सिंह यांना किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला तिकीट न देण्याचा आश्वासन देऊन निदर्शने मागे घेण्यास सांगितले होते.
आजच्या निवडणुकीत संजय सिंह यांच्या विजयामुळे कुस्तीपटू साक्षी मलिक, विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी निराशा व्यक्त केली आहे. आज माध्यमाशी संवाद साधताना साक्षी मलिक यांना अश्रू अनावर झाले. त्या म्हणाल्या "आम्ही लढलो...पण जर नविन अध्यक्ष हा ब्रिजभूषण सिंह यांचाच जवळचा सहकारी असेल आणि त्यांची व्यवसायिक भागीदारी असेल, तर मी कुस्ती सोडण्याचा निर्णय घेत आहे." अशा तिव्र भावना व्यक्त केल्या.
राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेती विनेश फोगट म्हणाल्या, "संजय सिंग यांची फेडरेशनच्या प्रमुखपदी निवड झाल्यामुळे महिला कुस्तीपटूंना पुन्हा छळाचा सामना करावा लागणार आहे. देशात न्याय कसा मिळवायचा हे समजत नाही".