शिरुर दुर्घटनाग्रस्तांना न्याय मिळवून द्या : प्रणवानंद स्वामींचे उपोषण
बेपत्ता झालेल्यांचा अद्याप शोध नाही : सरकारने दिलेली मदतही वाढवून देण्याची मागणी
कारवार : शिरुर दुर्घटनेतील मृत आणि बेपत्ता झालेल्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी इंडीग महामंडळाचे प्रणवानंद स्वामी यांनी बुधवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ उपोषण आंदोलन छेडले. जुलै महिन्यातील 16 तारखेला अंकोला तालुक्यातील शिरुर येथे राष्ट्रीय हमरस्त्यावर दरड कोसळली होती. या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला होता. तर तीन जण बेपत्ता झाले होते. बेपत्ता झालेल्यांचा अद्याप शोध लागलेला नाही. मृत झालेल्यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून यापूर्वीच मदत देण्यात आली आहे. तथापि, ही मदत वाढवून द्यावी या मागणीसाठी प्रणवानंद स्वामी यांनी उपोषण आंदोलन छेडले.
शिरुर येथील दुर्घटनेला राष्ट्रीय हमरस्ता प्राधिकार आणि आयआरबी ही बांधकाम कंपनी सर्वस्वी जबाबदार आहे. त्याकरिता राष्ट्रीय हमरस्ता प्राधिकार आणि आयआरबी कंपनीनेही मृतांच्या कुटुंबीयांना मदत द्यावी, अशी मागणी यावेळी स्वामींनी केली. शिरुर दुर्घटनेनंतर जगन्नाथ नाईक, लोकेश नाईक आणि केरळमधील ट्रकचालक अर्जुन यातीन या व्यक्ती बेपत्ता झाल्या आहेत. बेपत्ता झालल्या यातीन यांचा शोध लावण्यात घटनेला दीड महिन्याचा कालावधी लोटून गेला तरी यश आले नाही. शिवाय बेपत्ता झालेल्या त्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना सरकारकडून अद्याप मदत देण्यात आलेली नाही. किमान आतातरी बेपत्ता झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना मदत देण्याची मागणी यावेळी स्वामींनी केली.
केवळ आश्वासन पूर्तता नको
शिरुर दुर्घटनेनंतर घटनास्थळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी, मंत्री, खासदार, आमदारांनी भेट दिली. यावेळी बेपत्ता झालेल्या जगन्नाथ नाईक यांच्या दोन मुलींपैकी एका मुलीला रोजगार देण्याचे आश्वासन देण्यात आले. मुलीकडून बायोडाटा घेण्यात आला. तथापि, अद्याप रोजगाराचा पत्ता नाही. बाप बेपत्ता होवूनही संकटात सापडलेल्या त्या कुटुंबीयातील एखाद्या मुलीला तातडीने रोजगार मिळवून देण्याची मागणी प्रणवानंद स्वामींनी यावेळी केली.
खासदार विश्वेश्वर हेगडे यांच्याबद्दल असमाधान
उळूवरे येथील संकटात सापडलेल्या त्या कुटुंबीयांच्या व्यथा आणि कथा दिल्ली दरबारी मांडण्यासाठी प्रणवानंद स्वामी त्या कुटुंबीयांना दिल्लीला घेवून गेले होते. तथापि, कारवारचे खासदार विश्वेश्वर हेगडे यांनी तेथे साधी विचारपूसही केली नाही. याबद्दल स्वामींनी उपोषणाच्यावेळी असमाधान व्यक्त केले. या उपोषणा आंदोलनात शिरुर दुर्घटनेत मृत व बेपत्ता झालेल्यांचे कुटुंबीय आणि उळुवरे येथील पिडीत कुटुंबीय सहभागी झाले होते.