महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विलंबित न्याय

06:49 AM May 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

महाराष्ट्र अंधश्र्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी देण्यात आलेला निकाल विवेकवादासाठी दिलासाच म्हटला पाहिजे. किंबहुना हा निकाल देण्याकरिता जवळपास एक तप इतका कालावधी जात असेल, तर न्यायाच्या दृष्टीने हे काही चांगले लक्षण मानता येणार नाही. या प्रकरणात आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली असताना दुसरीकडे तपास अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, विक्रम भावे आणि अॅड. संजीव पुनाळेकर यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करावी लागली आहे, हे विसरता येत नाही. त्यामुळे न्याय पूर्ण मिळाला, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. आपल्या देशाला, महाराष्ट्राला सुधारणावादी विचारवंतांची प्रदीर्घ परंपरा लाभली आहे. डॉ. दाभोलकरही हीच परंपरा पुढे नेत होते. अंधश्रद्धा निर्मूलन हा त्यांचा श्वास आणि ध्यास होता. अंधश्रद्धेतून भोळ्या भाबड्या जनतेचे, गरीब समाजाचे शोषण होऊ नये, यासाठी ते कायम प्रयत्नरत असत. त्याच हेतूने अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ त्यांनी सर्वदूर पोहोचविली. दाभोलकरांच्या या कार्यामुळे धर्माचे नुकसान होईल, अशी भीती काही सनातनी मंडळींना वाटत होती. त्यातूनच पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळील महषी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर 20 ऑगस्ट 2013 रोजी पिस्तुलातून गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचे वृत्त समजताच संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. या हत्या प्रकरणाचा तपास पुणे शहर पोलिसांसह सुऊवातीला दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) केला. त्यानंतर सीबीआयकडे तपास सोपविण्यात आला. या प्रकरणात सनातन संस्थेशी संबंधित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, विक्रम भावे आणि अॅड. संजीव पुनाळेकर यांना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांच्याविऊद्ध पुण्यातील विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. यात सचिन अंदुरे, शरद कळसकर यांनी डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्याचा आरोप होता. तो न्यायालयात सिद्ध झाला. त्यामुळे या दोघांनाही शिक्षा सुनावण्यात आली आहे. डॉ. तावडेला पनवेलमधील सनातन संस्थेच्या आश्र्रमातून अटक करण्यात आली होती. तोच या कटाचा मुख्य सूत्रधार असल्याचा सीबीआयचा दावा होता. मात्र, त्याविषयीच्या सिद्धतेत तपास यंत्रणांना यश आले नाही. तर विक्रम भावे याने डॉ. दाभोलकर यांच्या हत्येपूर्वी घटनास्थळाची पाहणी केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. अॅड. पुनाळेकर याने डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडणारे आरोपी सचिन अंदुरे, शरद कळसकर यांना पिस्तूल खाडीत फेकून नष्ट करण्याचा सल्ला दिला होता. परंतु, या दोघांवरील आरोप सबळ पुराव्याअभावी सिद्ध होऊ शकले नाहीत. ही तपास यंत्रणांसाठी मोठीच नामुष्की ठरते. आरोपींवर संशय घेण्यास वाव असताना तपास अधिकाऱ्यांनी योग्य प्रकारे तपास केला नाही. तपासात निष्काळजीपणा दाखवल्यामुळे तीन आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात येत असल्याचे विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी नोंदविलेले निरीक्षणच बरेच काही सांगून जाते. मुळात तपास अधिकाऱ्यांनी इतका हलगर्जीपणा का करावा, हेच अनाकलनीय होय. न्यायालयानेही यासंदर्भात संबंधितांना खडे बोल सुनावले आहेत. मात्र, त्यातून आपल्या यंत्रणा सुधारणा का, हा प्रश्न अनुत्तरीतच असेल. काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असताना डॉ. दाभोलकर यांची, तर भाजपा सेना युती सरकारच्या काळात गोविंद पानसरे यांची हत्या झाली. तिकडे कर्नाटकात कलबुर्गी व पत्रकार गौरी लंकेश यांच्याही हत्या करण्यात आल्या. यात प्रामुख्याने पुरोगामी चळवळीतील विचारवंतांनाच टार्गेट केल्याचे दिसून आले. या चारही हत्यांमध्ये एक समांतर धागा वा साधर्म्य होते. परंतु, यंत्रणांना त्याचा सूत्रबद्धरीत्या तपास करता आला नाही. आजही मास्टरमाईंड किंवा सूत्रधार कोण, याचे गूढ कायम राहिल्याचे दिसते. ते कधी उकलणार का, हाच प्रश्न असेल. हा निकाल जाहीर झाल्यानंतर डॉ. दाभोलकर यांचे चिरंजीव डॉ. हमीद आणि कन्या मुक्ता दाभोलकर यांनी जरूर समाधान व्यक्त केले आहे. मात्र, मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्यात तपास यंत्रणेला अपयश आल्याने उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.  डॉ. नरेंद्र दाभोलकर, डॉ. एम. एम. कलबुर्गी, गोविंद पानसरे आणि गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आली. विवेकवाद्यांची हत्या हा व्यापक कटाचा भाग आहे. त्यामुळे तपास यंत्रणेने मुख्य सूत्रधाराचा शोध घेणे गरजेचे आहे, ही गोविंद पानसरे यांच्या स्नुषा मेधा पानसरे यांनी केलेली मागणी यथोचित ठरते. खरं तर विचार कधीही संपविता येत नाहीत. महात्मा गांधी यांची हत्या माथेफिरू नथुराम गोडसे याने केली. मात्र, गांधींनंतरही त्यांचे विचार कायम आहेत. जगभर गांधीविचारावर अभ्यास, चिंतन होत आहे. डॉ. दाभोलकर, पानसरे असतील किंवा कलबुर्गी, गौरी लंकेश असतील. त्यांच्या विचारांचा विचारांनी प्रतिवाद करण्याचे स्वातंत्र्य संबंधितांना निश्चित होते. मात्र, त्याऐवजी त्यांनी हिंसेचा मार्ग निवडला. परंतु, या अविचाराने या चारही विचारवंतांचे विचार संपले नाहीत आणि संपणारही नाहीत. अर्थात त्यांच्या हत्येने समाजाची झालेली हानीदेखील कधीही भरून निघणारी नसेल, हे नक्की. याप्रकरणात कर्नाटक एटीएसच्या कामाचे मात्र कौतुक करावे लागेल. पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या कर्नाटक एटीएसमुळेच या कटाचा उलगडा झाला, हे लक्षात घेतले पाहिजे. अर्थात सूत्रधारांना जोवर शिक्षा होत नाही, तोवर न्याय मिळाला, असे म्हणता येत नाही. त्यामुळे मास्टरमाईंड शोधलाच पाहिजे.

Advertisement

 

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article