वकिलांनी जामिनाच्या कायद्याचा सखोल अभ्यास करावा : न्यायमूर्ती अश्विन भोबे; सावंतवाडीत ‘जामिनाचा कायदा’ विषयावर व्याख्यान
सावंतवाडी तालुका वकील संघटनेतर्फे आयोजित ‘लेक्स डिस्कशन’ या व्याख्यानमालेत ‘जामिनाचा कायदा’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी जिल्हा सत्र न्यायाधीश त्रिपाठी, ज्येष्ठ वकील ॲड. दिलीप नार्वेकर आणि तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. बाळाजी रणशूर उपस्थित होते.
न्यायमूर्ती भोबे म्हणाले की, एखाद्या गुन्ह्याची फाईल वकिलांकडे आल्यानंतर त्यातील सर्व बाबींचा बारकाईने अभ्यास करणे आवश्यक आहे. आरोपीला जामीन मिळवून देण्यासाठी कोणत्या कायदेशीर तरतुदी लागू होतात, याची माहिती असणे गरजेचे आहे. केवळ जामीन प्रक्रियेची सर्वसाधारण माहिती असून चालत नाही, तर प्रत्येक गुन्ह्याच्या स्वरूपानुसार जामीन मिळवण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींचा अभ्यास असावा.
यावेळी त्यांनी जामिनाच्या विविध प्रकारांची माहिती दिली. अटक होण्यापूर्वी मिळवला जाणारा अटकपूर्व जामीन, अटक झाल्यानंतर किंवा न्यायालयीन कोठडीत असताना मिळणारा नियमित जामीन, निर्धारित मुदतीत दोषारोपपत्र दाखल न झाल्यास कायद्यानुसार मिळू शकणारा डिफॉल्ट जामीन, तसेच खटला प्रलंबित असताना शिक्षेच्या संभाव्य कालावधीपेक्षा अधिक काळ तुरुंगवास भोगलेल्या आरोपीला मिळू शकणारा जामीन याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. बेकायदेशीर अटकेच्या प्रकरणांमध्ये उपलब्ध कायदेशीर उपाययोजनांचीही त्यांनी माहिती दिली.
जामीन मिळवण्याबरोबरच जामीन रद्द करण्याची प्रक्रियाही महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. न्यायालयाने जामीन मंजूर करताना घातलेल्या अटींचा आरोपीने भंग केल्यास किंवा चुकीची माहिती देऊन जामीन मिळवल्याचे आढळल्यास त्याचा जामीन रद्द होऊ शकतो. त्यामुळे वकिलांनी या सर्व प्रक्रियांचा कायद्याच्या चौकटीत राहून अभ्यास करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी न्यायमूर्ती अश्विन भोबे आणि जिल्हा सत्र न्यायाधीश त्रिपाठी यांचे ॲड. बाळाजी रणशूर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी ज्येष्ठ वकील ॲड. दिलीप नार्वेकर यांच्या हस्ते न्यायमूर्ती भोबे यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
महिला उपाध्यक्ष ॲड. सिद्धी परब यांनी सूत्रसंचालन केले, तर ॲड. तृप्ती राऊळ यांनी परिचय करून दिला. अध्यक्ष ॲड. बाळाजी रणशूर यांनी आभार मानले. या व्याख्यानाला 120 हून अधिक वकील तसेच विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थितांनी कायदेशीर प्रक्रियेबाबत विचारलेल्या विविध प्रश्नांना न्यायमूर्ती भोबे यांनी समर्पक उत्तरे दिली.
