नालेसफाईच्या नावाने निव्वळ धूळफेक
पोस्टमन सर्कल येथील नाल्यात साचला प्लास्टिकचा कचरा
बेळगाव : महानगरपालिकेकडून नाले सफाईच्या नावाखाली निव्वळ धूळफेक केली जात आहे. पोस्टमन सर्कल शिवाजी रोड कॉर्नर येथील नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. कचरा साचला असल्यामुळे पाण्याचा निचरा होण्यास अडथळे निर्माण होत असून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नाल्याची स्वच्छता करण्याची मागणी केली जात आहे. आठवडाभरापूर्वी झालेल्या परतीच्या जोरदार पावसाने नाल्यात मोठ्या प्रमाणात कचरा येऊन साचला. प्लास्टिकच्या बाटल्या, टाकाऊ साहित्याने नाला भरला आहे. पाणी निचरा होत नसल्याने सांडपाण्याची दुर्गंधी येत आहे. या परिसरात अनेक हॉटेल, हॉस्पिटल, कार्यालये तसेच दुकाने आहेत. दुर्गंधीमुळे या सर्वांनाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे नाल्याची सफाई करण्याची मागणी केली जात आहे.
नालेसफाई केवळ दिखाऊपणा
महापालिकेकडून पावसाळ्यापूर्वी नालेसफाई मोहीम राबविली जाते. परंतु केवळ दिखाऊपणा करण्यासाठीच ही मोहीम चालविली जाते का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचला असतानाही स्वच्छतेकडे मात्र दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यातच नालेसफाई करण्यासाठी वाहने तसेच जेसीबी उपलब्ध नसल्याचे कारण वारंवार देण्यात येत आहे. आता लोकप्रतिनिधींनीच अधिकाऱ्यांची कानउघडणी करणे गरजेचे बनले आहे.