Satara News : नुसतीच चर्चा अंमलबजावणी मात्र शून्य!
गोडोलीतील वाहतूक कोंडी सुटता सुटेना
सातारा : गोडोली परिसरातील साईबाबा चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकच बिकट होत असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांचा संताप वाढू लागला आहे. पालिकेच्या निकालानंतर स्थानिक नगरसेवकांनी या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला असला तरी प्रत्यक्षात बांधकाम विभाग आणि पोलीस प्रशासन यंत्रणेकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नाही.
सातारा पालिकेतील बैठकीत बंद असलेली सिग्नल यंत्रणा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पोलीस आणि बांधकाम विभागानेही प्रारुप आराखडा तयार केला होता. मात्र, या सर्व चर्चेनंतरही प्रत्यक्ष अंमलबजावणी शून्य आहे.
गेल्या तब्बल २० वर्षांपासून या चौकातील सिग्नल यंत्रणा बंद असून, चौकाभोवती वाढलेले अतिक्रमण, रस्त्यावर पार्किंग, अरुंद रस्ते , वाढती वाहतूक वर्दळ यामुळे साईबाबा मंदिर चौकात कोंडी नित्याची झाली आहे.
शाळा, कॉलेज आणि कार्यालयीन वेळेत सकाळी ९ ते १०.३० व सायंकाळी ५ ते ७.३० या वेळेत परिस्थिती अधिकच गंभीर बनते. काही दिवसांपूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून पर्यायी व्यवस्था आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्या उपस्थितीत उपनगराध्यक्ष ॲड. डि. जी. बनकर, नगरसेवक विनोद मोरे, सुशांत महाजन, अनिता फरांदे, वैशाली राजेभोसले यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांची बैठकही झाली. मात्र, निर्णय कागदावरच राहिल्याचे स्पष्ट झाले आहे.