केवळ संभ्रम
सोमवारी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांचे वर्धापनदिन मेळावे झाले. खरंतर त्यांना स्थापना दिन मेळावे म्हटले पाहिजे पण यश अपयश काहीही पदरी पडो आपण मोठे होणार सत्ता मिळवणार ही आकांक्षा आहे. भाजपाचे दोनचे इतके झाले मग आमचेही होतील अशी मनिषा असल्याने त्या मेळाव्यांना वर्धापनदिन म्हणायचे. या मेळाव्यात जी भाषणे झाली, सोशल मीडियावर जी स्टेटस शेअर झाली आणि जे नाट्या समोर आले त्याचे वर्णन संभ्रम असेच करावे लागेल. या दोन्ही मेळाव्यातून जनतेच्या समोर केवळ आणि केवळ संभ्रम चितारला गेला आहे. मोठे पवार इतिहास सांगत आहेत, धाकटे पवार सत्ता हेच सर्वस्व हे सुत्र सिद्ध करत आहेत. शरद पवारांसोबत जे उरले आहेत ते गुळाला चिकटलेले मुंगळे आहेत, अशी शेलकी टीका अजितदादांनी सुरु केली आहे. माध्ममासमोर दोन्ही राष्ट्रवादीचे एकत्रीकरण होणार असे चित्र गेले दोन महिने रेखाटले जाते आहे, जी गोष्ट शिवसेना व मनसे यांच्या एकत्रीकरणाची सुरु आहे तीच कथा पवारांच्या राष्ट्रवादीत सुरु आहे. महाराष्ट्रात जनतेने नाकारलेली आघाडी जनतेच्या प्रश्नांवर अग्रेसर होण्याऐवजी आपले वैयक्तिक कसे साधेल यासाठीच धडपडताना दिसते आहे. ‘सत्तारुढ महायुतीने तूमच्यासाठी एक मंत्रीपद ठेवले आहे, साहेब सोबत आले तर केंद्रात त्यांना व ताईना महत्त्वाचे सत्तापद मिळू शकते’ असे दाणे टाकतांना सत्तारूढ दिसते आहेत. कुणालाच जनतेच्या प्रश्नांची व जनतेने सोपवलेल्या जबाबदारीची जाणीव उरलेली नाही. सारी सत्तेसाठीची नाटके सुरु आहेत, पुणे हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला मानला जात होता. लोकसभेला राष्ट्रवादीचे बरे जमले पण विधानसभा निवडणुकीत धोबीपछाड बसला. अजितदादा महायुतीसोबत होते म्हणून दंड फुगवून रोज टोप्या उडवत आहेत. शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या मनात काय आहे हे नेमके स्पष्ट झालेले नाही पण अस्वस्थता लपलेली नाही. एकीकडे इंडी आघाडीशी पंगा दुसरीकडे अजित पवारांशी गाठीभेटी तर ताईचे सारखं दादा दादा करणं, मोदींनी विदेशात भारताची बाजू मांडायला पाठवलेल्या शिष्टमंडळात सहभागी होणं, शरद पवारांनी भाकरी फिरवणार, महाराष्ट्र सुरक्षित हातात देणार हे पालूपद गाताना जयंत पाटील यांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका होऊपर्यंत अध्यक्षपद सांभाळायचे आदेश देणं व मग सर्वांचा विचार घेऊन तरुणांना संधी अशी पाटी लावणं, सारा संभ्रम आणि गोंधळ आहे. आमदार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी गेली सात वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळले आहे. ते इकडे जाणार, तिकडे जाणार अशा वावड्या नियमित उठत आहेत. पण जयंत पाटील यांच्या तोंडात ‘तुकाराम नथूराम’ ही भाषा घट्ट चिकटली आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला व आघाडीला लोकांनी नाकारले त्यामुळे व त्यांना पक्षातून अंतर्गत छुपा विरोध मोठा असल्याने जयंतरावांची सांगताही येत नाही अशी अवस्था झाली आहे. महाराष्ट्रात ठाकरे व पवार हे दोन ब्रँड होते दोन्हीचे तुकडे झाले आहेत. या पार्श्वभूमीवर या चौघांना एकत्र करून काही साधता येते का? हे तपासायचे धोरण दिसते आहे. सत्ताप्राप्तीच्या या इच्छेला महाराष्ट्रहीत, मराठी हित अशी जोड दिली जात आहे पण लोक त्यांना कसा प्रतिसाद देतात, यावर सारे अवलंबून आहे. मोदींनी देशभरातील कौटुंबिक पक्ष गुंडाळत आणले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये आणखी एकदा परीक्षा द्यावी, असा मनसुबा झालेला दिसतो. अजितदादांची बोटे सध्या तुपात आहेत. त्यांना या ऐक्याचे काहीही पडलेले नाही आणि ठाकरे बंधूत हात कुणी पुढे करायचा, टाळी कुणी द्यायची यावरुन चर्चा सुरू आहे. अटी, शर्थी घातल्या जात आहेत पण सर्वांच्याच लक्षात आले आहे, ही अस्तित्वाची लढाई आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक जवळ येते आहे, हे लक्षात घेऊन काही मंडळी आतला डाव, बाहेरचा डाव खेळणार हे उघड आहे. पश्चिम महाराष्ट्रात काही छुप्या युत्या होतील, अशीही कुजबुज आहे. पण वर वर वेगळेच चित्र दाखवले जाते आहे. सोशल मीडियावर रोज वेगळी हवा पसरवली जाते आहे. आणि सर्वांचे उद्दिष्ट आपले कसं साधणार याकडेच आहे. दोन्ही राष्ट्रवादीचे एकत्रीकरणाबाबत सुप्रियाताई भूमिका घेतील, असे शरद पवारांनी म्हटले होते पण ताईंनी व साहेबांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही व संभ्रम वाढवण्याची संधी सोडलेली नाही. त्यातच सुनील तटकरेंनी म्हटले आहे, “निवडणुकीत आमचा स्ट्राइक रेट जास्त होता. त्यामुळे एकत्र येण्याबाबत ज्याच्या त्याचा विचार वेगळा असू शकतो. मी त्यावर अधिक बोलू इच्छित नाही.” दुसरीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील नेते प्रशांत जगताप यांनी, “आम्ही त्यांच्याकडे जाण्याचा कोणताच प्रश्न नाही. जर त्यांनाच आमच्याकडे यायचे असेल तर त्यांनी भाजपाची साथ सोडावी आम्ही त्यांचे स्वागत करू”, असे वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाच्या दरम्यान म्हटले होते. एकुणच मनसे व शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन्ही गटात टाळी द्यायची का? इथपासून हात कुणी पुढे करायचा, यावरही मतभेद दिसत आहेत व त्यातून संभ्रम वाढताना दिसत आहे. संसदेचे अधिवेशन आणि महाराष्ट्राचे पावसाळी अधिवेशन नजीक आहे तेथे हे संभ्रम दूर होण्याची शक्यता आहे पण आजघडीला संभ्रम व त्यातून संबधिताची उंची, आवाका, आकांक्षा आणि सत्ताओढ लपून राहिलेली नाही. महाराष्ट्रातील जनतेनेही खरे खोटे ओळखले आहे. आता मुंबई कुणाची आणि ग्रामीण महाराष्ट्रात वरचढ कोण हे जेव्हा स्पष्ट होईल तेव्हाच हे सारे संभ्रम दूर होतील तूर्त रोज रिल्स येत आहेत, स्टेटस बदलले जात आहेत. राजकीय गट इकडून तिकडे, तिकडून इकडे उड्या मारत आहेत, भ्रष्टाचार, गैरव्यवहार, फसवणुकीची प्रकरणे रोज बाहेर येत आहेत, निसर्गाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे, कोटी कोटी रुपयांचे घोटाळे समोर येत आहेत. आमदारांचे सहाय्यक सहा-सात कोटीची रक्कम संकलीत करताना सापडत आहेत. सहाय्यक आयुक्त लाच प्रकरणात सापडले आहेत पण कुणाला कशाचीच काही पडलेली नाही, जो तो बुंदी संपायच्या आधी पंगतीत बसायच्या नादात आहे. लोकांच्यात संभ्रम माजवून पोळी भाजण्याचे प्रयत्न त्यासाठीच सुरू आहेत.