ज्युरासिक वर्ल्ड रीबर्थ चित्रपटाचा ट्रेलर सादर
जिवंत डायनासोरचा डीएनए अन् माणसांवर घोंगावणारा धोका
ज्युरासिक वर्ल्ड फ्रेंचाइजीचा नवा चित्रपट ‘ज्युरासिक वर्ल्ड रीबर्थ’चा ट्रेलर सादर करण्यात आला आहे. या फ्रेंचाइजीचा हा सातवा चित्रपट आहे. ज्युरासिक वर्ल्ड फ्रेंचाइजीची जगभरात मोठी फॅन फॉलोइंग आहे. आतापर्यंत याच्या सर्व चित्रपटांना प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली आहे. ज्युरासिक वर्ल्ड रीबर्थ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये डायनासोरच्या जगतात पुढे काय घडणार हे दिसून येते. 2 जुलै रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात स्कार्लेट जॉन्सन, जोनाथन बॅले आणि महेरशला अली हे कलाकार दिसून येणार आहेत. डायनासोरचा पृथ्वीवरून अंत होणार असून जंगलात सर्वत्र धोका घोंगावत आहे. अशा स्थितीत डायनासोरचा डीएनए आणि जेनेटिक सॅम्पल घेण्याची अखेरची संधी आहे. या मिशनची धुरा स्कार्लेट साकारत असलेल्या व्यक्तिरेखेला सोपविली जाते, जी एका गुप्त स्वरुपात ऑपरेशन सांभाळत आहे. जिवंत डायनासोरचा डीएनए मिळविला जाणार असल्याने या मिशनमध्ये मोठा धोका असल्याचे ट्रेलरमध्ये दाखविण्यात आले आहे. 2022 मध्ये प्रदर्शित ‘ज्युरासिक वर्ल्ड : डोमिनियन’मध्ये झालेल्या घटनांच्या 5 वर्षांनंतरची कहाणी ज्युरासिक वर्ल्ड रीबर्थमध्ये दाखविण्यात आली आहे.