जुन्ता हाऊस ‘स्मृती ठेऊनी’ जाणार!
कार्यालयांचे स्थलांतरण सुरू, जिल्हाधिकाऱ्यांकडून 30 दिवसांची मुदत
प्रतिनिधी/ पणजी
विविध प्रमुख सरकारी कार्यालयांचा एकच पत्ता असणारी राजधानीतील सर्वात उंच आणि प्रशस्त तथा प्रतिष्ठित इमारत अशी ओळख असलेली जुन्ता हाऊस इमारत लवकरच काळाच्या पडद्याआड जाणार असून एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड या कंपनीकडून तिचा पुनर्विकास करण्यात येणार आहे.
गोव्याच्या स्वातंत्र्यानंतर पणजीत मध्यवर्ती ठिकाणी बांधण्यात आलेल्या या भव्य प्रकल्पाने किमान सहा दशकांची सेवा बजावली व आता ती जीर्ण झाल्यामुळे तिच्या संरचनात्मक असुरक्षिततेचा हवाला देत ती पाडण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या तेथे असलेल्या कार्यालयांना स्थलांतर करण्यास सांगण्यात आले असून जिल्हाधिकाऱ्यांकडून तसा आदेश जारी करण्यात आला आहे. त्यानुसार अनेक कार्यालयांनी आवराआवर प्रारंभ केली आहे, तर काही जण अद्याप सुयोग्य जागेच्या शोधात असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. तरीही 30 दिवसांच्या आत त्यांना विद्यमान कार्यालय सोडावेच लागणार आहे, अशीही माहिती मिळाली आहे.
सध्या या इमारतीत किमान 21 कार्यालये असून इमारत जीर्ण व असुरक्षित बनल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली ती रिक्त करण्याचा आदेश उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. काही स्ट्रक्चरल दोषांमुळे सदर इमारत दुरूस्त करणे शक्य नसल्याचे साबांखाने स्पष्ट केले आहे.
या इमारतीतील प्रमुख खात्यांमध्ये वाहतूक, नागरी पुरवठा, वन खाते, वन महामंडळ, ग्राहक आयोग, राजभाषा संचालनालय, खादी ग्रामोद्योग, महिला आयोग, साबांखाचे विविध विभाग, जिल्हा सहकार निबंधक, आदींचा समावेश आहे. त्याशिवाय तळमजल्यावर सहकार भांडार आणि किमान डझनभर खाजगी दुकाने आहेत. या सर्वांना आता ती जागा सोडावी
लागणार आहे.
प्राप्त माहितीनुसार या इमारतीतील काही कार्यालये आल्तिनो भागात तर काही कार्यालये जुन्या सचिवालय इमारतीत स्थलांतरित होणार आहेत. त्याशिवाय काही कार्यालये रिक्त असलेल्या सरकारी गाळ्यांमध्ये थाटण्यात येतील. काही कार्यालयांना मात्र अद्याप योग्य जागा मिळालेली नाही. अशा खात्यांचे प्रमुख योग्य जागांचा शोध घेत आहेत.