ज्युनियर एनटीआरने केली नव्या चित्रपटाची घोषणा
पॅन इंडिया स्टार ज्युनियर एनटीआर सध्या एका मागोमाग एक स्वत:च्या चित्रपटांचे चित्रिकरण पूर्ण करत आहे. याचदरम्यान त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा झाली आहे. ज्युनियर एनटीआर आणि दिग्दर्शक त्रिविक्रम श्रीनिवास यांच्या आगामी बिग प्रोजेक्टचा खुलासा झाला आहे. यापूर्वी ‘अरविंदा समेता वीरा राघवा’ या चित्रपटासाठी दोन्ही दिग्गज एकत्र आले होते. नव्या चित्रपटाचे पोस्टर ज्युनियर एनटीआरने शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये त्रिशूळ आणि भाला दिसून येत असून यावर ‘एक त्रिशूळ, एक उद्देश, एक दैवीय हिशेब’ अशी टॅगलाइन आहे. हा चित्रपट पौराणिक कथांनी प्रेरित एक अत्यंत मोठा प्रोजेक्ट असल्याचे सांगण्यात येत आहे. या पोस्टरच्या कॅप्शनमध्ये एनटीआरने ‘सन ऑफ शिवा, प्राइड ऑफ पार्वती आणि एक शूर सेनापती’ असे नमूद केले आहे. यामुळे हा चित्रपट भगवान शिव यांचे पुत्र कार्तिकेय यांच्यावर आधारित असू शकतो असा दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे. या चित्रपटाला अनिरुद्ध रविचंदर संगीत देणार आहे. या चित्रपटाची कहाणी स्वत: त्रिविक्रम श्रीनिवास यांनी लिहिली असून तेच दिग्दर्शन करणार आहेत.