Kolhapur News : फुलेवाडी अग्निशमन इमारतीच्या दुर्घटनाप्रकरणी कनिष्ठ अभियंता प्रमोद बराले निलंबीत!
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केलेल्या सूचनेनुसार केली ही कारवाई
कोल्हापूर : फुलेवाडी फायर स्टेशन दुर्घटना प्रकरणी प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी कनिष्ठ अभियंता प्रमोद बराले यांना निलंबित केले. तर शहर अभियंता रमेश मस्कर, उपशहर अभियंता सुरेश पाटील यांची खातेनिहाय चौकशी का करु नये याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केलेल्या सूचनेनुसार प्रशासक यांनी शनिवारी ही कारवाई केली.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी शुक्रवारी महापालिकेत आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक यांच्यासमवेत आढावा बैठक घेतली. बैठकीमध्ये लोकप्रतिनिधी, पालकमंत्री आबिटकर यांच्यासमोर मनपा प्रशासनाच्या गलथान कारभाराचा पाढाच वाचला. यावर पालकमंत्री आबिटकर यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याच्या सूचना केल्या.
तसेच फुलेवाडी फायर स्टेशनदुधटना, शात्सव काळातील पाणीपुरवठा खंडात, खराब रस्ते याबाबत चौकशी करुन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी शनिवारी अधिकाऱ्यांवर कारवाई केली.
व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याच्या सूचना
शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पाणीपुरवठा, पार्किंग, वाहतूक कोंडी, रस्ते यासह अन्य आवश्यक सुविधांचा विचार करुन व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याच्या सूचना संबंधित विभागांना प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी दिल्या.
पाणीपुरवठा प्रश्नी चौकशी अन् नोटीस
काळम्मावाडी योजनेतील पंप वारंवार बंद पडत असल्याने सखोल चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंतायांच्यामार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच यासंदर्भातील अहवाल ११ ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याच्या सूचना कार्यकारी अभियंता यांना दिल्या आहेत.
त्याचबरोबर गणेशोत्सव काळात शहरात आठ दिवस पाणीपुरवठा खंडीत राहिल्याने नागरिकांना नाहक त्रास झाला. त्याबाबत जल अभियंता हर्षजीत घाटगे, सहा. अभियंता यांत्रिकी जयेश जाधव यांची खातेनिहाय चौकशी का करण्यात येऊ नये म्हणून कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
शहरातील रस्ते कामाची होणार तपासणी
शहरातील १०० कोटी निधीतून झालेल्या व अन्य रस्ते कामाची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या क्वॉलिटी टेस्टींग एजन्सीमार्फत तपासणी करण्याचे आदेश प्रशासक यांनी दिले आहेत. एजन्सीच्या अहवालानंतर संबंधित ठेकेदारांवर कारवाई करण्यात येणार आहे.
मनपाच्या खुल्या जागेतील अतिक्रमण हटवा
ब्लू लाईनमधील शंभर फुटी रस्ता संपादन करण्यासाठी नगरविकास विभागास प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. तसेच महापालिकेच्या खुल्या जागांना नाव लावण्याची कार्यवाही करणे आणि खुल्या जागेतील अतिक्रमण हटविण्याची सूचना नगररचना विभागाला प्रशासक यांनी दिली आहे.