ग्वाल्हेर येथे कनिष्ठ डॉक्टरवर बलात्कार
वृत्तसंस्था / ग्वाल्हेर
मध्यप्रदेशातले शहर ग्वाल्हेर येथे एका कनिष्ठ महिला डॉक्टरवर तिच्याच सहकाऱ्याकडून बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपासाला प्रारंभ करण्यात आला आहे. या प्रकरणातली पिडिता परीक्षेचा अम्यास करण्यासाठी महाविद्यालयाच्या महिला वसतीगृहात वास्तव्यास होती. आरोपी हा या पिडितेच्याच वर्गात शिकत आहे. त्याने तिला विद्यार्थ्यांच्या वसतीगृहात भेटण्यासाठी बोलाविल्याने ती तेथे गेली होती.
ती एकटी असल्याचा गैरफायदा घेत तिच्या सहकाऱ्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले अशी तक्रार पिडितेने सादर केली आहे. त्यानंतर तपासाची चक्रे फिरु लागली. अखेरीस मंगळवारी आरोपीला अटक करण्यात आली आहे. ज्या स्थानी हा गुन्हा घडला ते पुरुष विद्यार्थ्यांचे जुने वसतीगृह होते. ते उपयोगात नसल्याने रिकामे होते, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. आरोपीला बुधवारी न्यायालयात नेले जाणार असून त्याची कोठडी मागितली जाणार आहे.