Juna Budhwar Peth: इतिहासाशी निकटचा संबंध, जुना बुधवार पेठ तालीम नवीन देखण्या रुपात...
जुना बुधवार पेठ तालमीची स्थापना 1838 साली झाली आहे
By : सुधाकर काशीद
कोल्हापूर : ही तालीम 1838 साली स्थापन झाली. कोल्हापुरात प्रवेश करताना आपलं स्वागत करते. जुना बुधवार पेठेचा कोल्हापूरच्या इतिहासाशी निकटचा संबंध आहे. ज्या ब्रह्मपुरी टेकडीवर मूळ कोल्हापूर होते त्याच्या पायथ्यालाच ही पेठ आहे.
रहिवाशांच्या समोरच्या दारातून पाहिले तर वाहनांच्या गर्दीतले, धावपळीतले कोल्हापूर दिसते. आणि मागच्या दारातून पाहिलं तर जोतिबा डोंगरापर्यंत पसरलेली हिरवीगार ऊसशेती दिसते. पेठेला राजकीय इतिहासाची, सामाजिक बांधिलकीची आणि मर्दानी खेळाची मोठी परंपरा आहे.
भारतीय स्वातंत्र्याची चळवळ, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, गोवा मुक्ती आंदोलन आणि सीमा लढा यात बुधवार पेठेने कोल्हापूरची अस्मिता देशभर पोहचवली. मर्दानी खेळाची परंपरा, तांबड्या मातीतील कुस्ती व फुटबॉलची रग या पेठेने जिवंत ठेवली आहे. याहीपेक्षा उद्योग, कला, संस्कृती, सणसमारंभ कोल्हापुरी थाटात जपताना बदलत्या प्रवाहाशीही व्यवस्थित जुळवून घेतले आहे.
जुना बुधवार पेठ तालमीची स्थापना 1838 साली झाली आहे. या तालमीत लाल मातीचा हौदा आजही आहे. सुरुवातीला ही तालीम एक मजली. त्यानंतर दुमजली आणि आता तीन मजली झालीय. नव्या धाटणीची बांधणी झाली आहे. शिवाजी महाराज, रणरागिणी ताराराणी आणि
शाहू महाराज यांच्या 14 फूट उंचीच्या प्रतिमा उभारल्यात. त्यांचे अनावरण लवकरच होणार आहे. बुधवार पेठेत प्रत्येकजण प्रत्येकाच्या ओळखीचा आहे. एकमेकांच्या पुऱ्या खानदानाची ओळख सांगण्याइतकी ही जवळीक आहे. इथं एखाद्या घरातले लग्न म्हणजे सगळ्या गल्लीत त्या लग्नाची धांदल.
पंगती वाढायला गल्लीतलीच फौज. कोणाच्या घरात नवं बाळ जन्माला आले की दोस्त मंडळींनी फटाक्याची माळ लावायची हे ठरलेलं. एखाद्या घरात दु:खद प्रसंग घडल्यावर मदतीसाठी झटणारी माणसं बघितली तरी नक्कीच त्या कुटुंबावरचा दु:खाचा डोंगर हलका करण्याची त्यात ताकद दिसते.
बुधवार पेठेने सामाजिक आणि राजकीय प्रतिष्ठा जपली आहे. कोणताही पक्ष असो कोणताही नेता असो जुना बुधवार पेठ पेठेला दुखवत नाही. दुखावलं तर काय होते याचे राजकीय आणि सामाजिक अनुभव अनेक नेत्यांनी घेतले आहेत. पेठे लगतच पंचगंगा नदी आहे. आणि दुसऱ्या बाजूला स्मशान भूमी आहे.
या पेठेची रचना बघितली तर अर्ध्या भागात मुस्लिम वस्ती. अर्ध्या भागात ख्रिश्चन वस्ती. शिवाजी पुलाला लागून भोई समाज वस्ती, सिद्धार्थनगर म्हणजे दलित समाज वस्ती, तोरस्कर चौक, डांगे गल्ली, ढिसाळ गल्ली, निकम गल्ली, शाहू गल्ली, हळदकर पॅसेज, बोडके गल्ली, विवेकानंद कॉलेज. बहुसंख्य मराठा व इतर मागासवर्गीय समाज.
एकमेकांत मिसळून गेलेला असा हा परिसर. क्रांतिकारकांना आसरा देणारी तालीम अशी ओळख आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा जिह्यात स्वातंत्र्य चळवळीच्या काळात स्वातंत्र्यसैनिक आपल्या भावना तीव्र शब्दाने व्यक्त करत. त्यांच्यामागे पोलिसांची कारवाई ठरलेली असे.
त्यामुळे भूमीगत स्वातंत्र्य सैनिक या तालमीत आसऱ्यासाठी यायचे. त्यांची व्यवस्था व्हायची. त्यामुळे या तालमीवर पोलीस धाड घालायचे. पण पेठेतले लोक अशा वेळी या स्वातंत्र्यसैनिकांना अन्यत्र हलवून त्यांच्यावरची कारवाई थांबवायचे. मर्दानी खेळ म्हणजे या पेठेची शान होती. गणेश चतुर्थी किंवा शिवजयंती असू दे त्यात मर्दानी खेळ असणारच.
लग्नाच्या वरातीत डॉल्बी ऐवजी मर्दानी खेळाचा थरार दिसे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत शंकर तोरस्कर या तरुणाने बलिदान दिले. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात बिंदू चौकाकडे मोर्चा निघाला होता. त्या मोर्चाला पुढे जाऊ द्यायचे नाही, असा आदेश असल्याने पोलिसांनी तो रोखला. पण तोरस्कर पोलिसांचे कडे तोडून निघाला.
त्या झटापटीत शंकर तोरस्कर याला संगीन लागली आणि त्याचा मृत्यू झाला. प्रचंड म्हणजे प्रचंड अशी त्याची अंतयात्रा निघाली. त्याच्याच नावाने शंकर तोरस्कर चौक आहे. या बलिदानाची कमी माहिती कोल्हापूरकरांना आहे . आजही कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्षात, वेगवेगळ्या सामाजिक संस्थेच्या संपर्कात आहेत. पण तालीम म्हटलं की सगळे एक, हे तत्व कायम आहे.
त्यामुळे तालमीचा कोल्हापूरच्या राजकारणात समाज जीवनात मोठा सहभाग आहे. तालमीच्या नूतनीकरणाला सुरेश साळुंखे, मालोजीराजे, जयश्री जाधव आणि राजेश क्षीरसागर या आमदारांनी निधी दिला आहे. या तालमीने आपल्या जागेत भुईवाडी तत्त्वाने 40 कुटुंबांना छोटी घरे बांधून दिली आहेत.
पार्किंगसाठीही तालमीची जागा दिली आहे. घरगुती समारंभासाठी अल्पदारात हॉल आहे. या तालमीची शिवजयंतीची, त्र्यंबोलीला पाणी वाहण्याची मिरवणुकही मोठी असते. आता तालमीच्या मुख्य इमारतीवर छत्रपती शिवाजी महाराज, महाराणी ताराराणी व शाहू महाराज यांच्या शिल्परूपातील प्रतिमा केल्या आहेत.
या मूर्ती सर्जेराव निगवेकर, सत्यजित निगवेकर, अमित विवर्धने यांनी केले आहेत. अजय दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली ही उभारणी झाली आहे. उल्हास जाधव, संतोष भोसले, किशोर पाटील यांनी तांत्रिक बाजू सांभाळली आहे. जुना बुधवार पेठ म्हणून या परिसराची ओळख आहे.
शिवाजी पेठ असलेल्या परिसरास नवीन बुधवार पेठ असे पूर्वी नाव होते. कालांतराने या पेठेचे नाव शिवाजी पेठ झाले . जुना बुधवार पेठ पंचगंगा नदीच्या तीरावरची पेठ आहे. त्यामुळे पंचगंगा नदीवर पोहायला जाणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. पंचगंगेच्या पात्राची स्वच्छता राखण्यात याच पेठेतील तरुणांचा सहभाग असतो.
सात आठ वर्षांपूर्वी पंचगंगा नदीच्या पुलावरून एक प्रवासी टेम्पो नदीच्या पात्रात कोसळला होता. त्या वेळी रात्री साडेबारा एकच्या सुमारास जुना बुधवार पेठेतील तरुणच नदीच्या पात्रात उतरले होते आणि कोणतीही शासकीय सेवा या दुर्घटनेच्या ठिकाणी पोहोचण्याआधी येथील तरुणांनी नदीतील सर्व मृतदेह बाहेर काढले होते.
प्रत्येक गावाला त्याचा एक इतिहास आणि भूगोल असतो आणि तोच त्या गावाचा पाया समजला जातो. कोल्हापूरलाही असाच इतिहास भूगोल आहे. .आणि तो पेठा, तालमी आदी अनेक वैविध्यामुळे टिकून आहे. किंबहुना कोल्हापूर कायम जिवंत, रसरशीत राहिले ते यामुळेच. यामध्ये जुना बुधवार पेठेचा फार मोठा वाटा आहे. आता ही जुना बुधवार पेठेची तालीम कात टाकून नव्या रूपात उभी राहिली आहे.
"कोल्हापूरच्या समाज जीवनात आमच्या बुधवारपेठेने कोल्हापुरातील सांस्कृतिक सामाजिक धार्मिक परंपरा खूप आस्थेने जपल्या आहेत.तिच्या इमारतीचे संवर्धन व जतन आम्ही पेठेतल्या सर्वांनी मिळून केले आहे .आम्ही व्यक्तिगत पातळीवर वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते आहोत .पण तालीम म्हटले की आम्ही एक होतो आणि तालमीचा अभिमान कायम एका वेगळ्या आस्थेने जपतो."
- रणजीत शिंदे. अध्यक्ष,
तालमीची सध्याची कार्यकारिणी रणजीत मारुती शिंदे - अध्यक्ष,विजय मारुती हांडे - उपाध्यक्ष, सुनील केशव शिंदे - सचिव, रमेश पुरेकर - उपसचिव, धनाजी दिंडे - खजानिस, विराज पाटील- ऑडिटर, संचाक - संतोष दिंडे, सुशील बांदिगिरे, प्रवीण हुबाळे, श्रीधर निकम, रवींद्र सावंत, राजेंद्र माने, संग्राम पाटील व सुशांत महाडिक.