Ganeshotsav 2025 Juna Budhwar Peth: टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ, विधायक गणेशोत्सव
कोणाकडून वर्गणीची मागणी न करता घरोघरी जाऊन लोकांना आवाहन केले जाते
By : गौतमी शिकलगार
कोल्हापूर : सध्या भरमसाठ वर्गणी घेऊन गणेशोत्सव साजरा करणारी सार्वजनिक मंडळे आजूबाजूला दिसतात. परंतु समाजप्रबोधन देखावा, शून्य प्रदूषण आणि पर्यावरण संरक्षणाचा वसा घेतलेले जुना बुधवार पेठेतील डांगे गल्ली तरुण मंडळ हे याला अपवाद आहे. कोणाकडून वर्गणीची मागणी न करता घरोघरी जाऊन लोकांना आवाहन केले जाते. तुमच्या घरातील टाकाऊ वस्तू, स्क्रॅप आमच्याकडे जमा करा, असे सांगितले जाते.
त्याचा पुनर्वापर करुन अनोखा असा गणेशोत्सव साजरा केला जातो. डांगे गल्लीत 50 वर्षांपूर्वी या मंडळाची स्थापना झाली. मात्र गेल्या 13 वर्षांपासून मंडळ विधायक, सामाजिक, पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करत आहे. नागरिकांकडून पैशाच्या स्वरुपात वर्गणी स्वीकारण्यापेक्षा वेगळा विचार करुन टाकाऊ वस्तू देण्याचे आवाहन केले जाते. यातूनच विधायक गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प पुढे आला.
याशिवाय आगमन आणि विसर्जन सोहळ्याला साऊंड सिस्टीमला फाटा देत केवळ पारंपरिक वाद्यांचा वापर मंडळाकडून होतो. समाज प्रबोधनपर देखावे ही या मंडळाची जमेची बाजू आहे. दरवर्षी एखादा वेगळा विषय घेऊन कोल्हापुरात सामाजिक संदेश दिला जातो. यामध्ये पाणी वाचवा, सोलर सिस्टीमचा वापर वाढवा, कोल्हापूर शहरातील नागरी समस्या मांडण्याचा प्रयत्न, वाढलेली महागाई, राजर्षी शाहू महाराजांचे कार्य आणि कोल्हापूर असे काही ऐतिहासिक देखावे साजरे केले जातात.
यंदाच्या देखाव्याचा विषयही पर्यावरणाशी मिळताजुळता आहे. वाढणारे प्रदूषण, हवामान बदल यामुळे पृथ्वीला, मानवी जीवनाला कोणता धोका निर्माण झाला आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न आहे. सामाजिक कार्यांमध्ये दरवर्षी गरजू मुलांना शालेय साहित्याचे वाटप, रक्तदान शिबिर, लहान मुलांसाठी स्पर्धा, उपक्रम, गरजू व्यक्तीला आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न असतो.
गणेशोत्सवानंतर पंचगंगा नदीची स्वच्छता, गणेशमूर्ती पाण्यात विसर्जित न करता ती दान केली जाते. समाजप्रबोधनपर विषयांना अनुसरुन गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली जाते. नागरिकांकडून येणाऱ्या टिकाऊ वस्तूंमध्ये अनेकदा सायकल दुरुस्त करुन गरजूंना दिल्या जातात. घरांसाठी लागणाऱ्या वस्तू ग्रामीण भागांतील लोकांना दिल्या जातात. गणेशोत्सवामध्ये महाप्रसादाचे नियोजन न करता अंधशाळा, अनाथ वस्तीगृह अशा ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न असतो.
सकारात्मक प्रतिसाद
"या उपक्रमांसाठी नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद आहे. नागरिक घरांतील टाकाऊ वस्तू साठवून ठेवतात आणि गणेशोत्सवाला दरवर्षी त्या वस्तू मंडळाकडे आणून देतात. नागरिकांतून आमच्या या उपक्रमाचे कौतुक होते. तसेच साऊंड सिस्टीम मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याला आमच्या मंडळाच्या युवकांचा पाठिंबा असतो."
- गणेश पाटील, मंडळाचे कार्यकर्ते