जम्बो सवारीने पारणे फिटले
देश-विदेशातील लाखो पर्यटकांनी अनुभवला सांस्कृतिक वैभव
प्रतिनिधी/ बेंगळूर
जगप्रसिद्ध ऐतिहासिक म्हैसूर दसरोत्सवातील प्रमुख आकर्षण असलेल्या जम्बो सवारीने लाखो प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फिटले. मागील दहा दिवसांपासून राज्याच्या विविध कला, सांस्कृतिक वैभव पाहण्यासाठी देश-विदेशातून लाखो पर्यटक सांस्कृतिकनगरी म्हैसुरात दाखल झाले होते. दसरोत्सवाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच विजयादशमीदिनी जम्बो सवारी आणि मशाल परेडने प्रेक्षक भारावून गेले.
गुरुवारी सायंकाळी 4:45 वाजता मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अभिमन्यू हत्तीच्या पाठीवरील सुवर्ण अंबारीतील चामुंडेश्वरी देवीच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी केल्यानंतर जम्बो सवारीला प्रारंभ झाला. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, मंत्री एच. सी. महादेवप्पा, खासदार व वडेयर राजघराण्याचे वंशज यदुवीर कृष्णदत्त चामराज वडेयर व इतर मान्यवर उपस्थित होते.
राजेशाही थाटात निघालेल्या अभिमन्यू हत्तीसोबत कावेरी आणि रुपा तसेच इतर हत्ती जम्बो सवारीत सामील झाले होते. अधूनमधून पावसाच्या सरी आणि प्रेक्षकांचा जयघोषात जम्बो सवारी बन्नी मंडपाच्या दिशेने मार्गस्थ झाली. सहाव्यांदा 750 किलो वजनाची सुवर्ण अंबारी पाठीवर वाहून नेण्याचा मान अभिमन्यूला मिळाला. जम्बो सवारीनिमित्त त्यांनाही आकर्षक रंगीत नक्षीकाम करण्यात आले होते. जम्बो सवारीत सामील झालेल्या 60 हून अधिक चित्ररथ, कलापथके, वाद्यवृंद, पोलिसांचे बॅण्ड पथक, अश्वदलांनी देखील उपस्थितांची मने जिंकली. सायंकाळी बन्नी मंडप येथे जम्बो सवारीची सांगता झाली.

जम्बो सवारीपूर्वी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार व इतर मान्यवरांनी दुपारी 1 ते 1:18 दरम्यान अंबाविलास राजवाड्याच्या बलराम दरवाजाजवळ नंदीध्वजाची पूजा केली. त्यानंतर विविध कलापथके व चित्ररथ मार्गस्थ झाले. त्यानंतर जम्बो सवारीतील हत्ती राजवाडा आवारातून जम्बो सवारी मार्गावरून बन्नी मंडपपर्यंत निघाले. यावेळी राजवाडा आवारात विशेष पास आणि गोल्ड कार्ड असणाऱ्या प्रेक्षकांना आसनव्यवस्था करण्यात आली होती. रस्त्याच्या दोन्ही कडेला थांबून देखील अनेकांनी सांस्कृतिक सोहळा अनुभवला.
दहा दिवस विविध कार्यक्रम
22 सप्टेंबर रोजी चामुंडेश्वरी टेकडीवर साहित्यिक बानू मुश्ताक यांच्या हस्ते म्हैसूर दसरोत्सवाला चालना देण्यात आली होती. मागील दहा दिवसांपासून एअरो शो, दसरा कुस्ती, महिला दसरा, दसरा फुड फेस्टिव्हल, शेतकरी दसरा, दसरा क्रीडा मेळा, चित्रपट महोत्सव, ड्रोन शो असे अनेक भरगच्च कार्यक्रम आयोजिण्यात आले होते. दसरोत्सवाच्या पार्श्वभूमीवर म्हैसूर शहरातील सर्व चौक व महत्त्वाच्या रस्त्यांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. आणखी आठवडाभर विद्युत रोषणाई सुरू राहणार आहे.
मशाल परेडने दसरोत्सवाची सांगता
गुरुवारी सायंकाळी जम्बो सवारी संपल्यानंतर बन्नी मंडप मैदानावर मशाल परेडने दसरोत्सवाची सांगता करण्यात आली. 7:30 वाजता मशाल परेडला प्रारंभ झाला. पोलीस दलातील कर्मचाऱ्यांनी विविध प्रकारची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी राज्यपाल थावरचंद गेहलोत व इतर मान्यवर उपस्थित होते.