‘जुमांजी 4’चा ट्रेलर प्रदर्शित
1995 साली हॉलिवूडमध्ये एक फॉरेस्ट अॅडव्हेंचर कॉमेडी ड्रामा फिल्म फ्रेंचाइजीची सुरुवात झाली होती, ज्याचे नाव ‘जुमांजी’ होते. काल्पनिक कहाणी असलेल्या जुमांजी फ्रेंचाइजीने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. दीर्घकाळापासून ड्वेन जॉन्सनची मुख्य भूमिका असलेल्या जुमांजी 4 चे नाव चर्चेत आहे आणि आता याचा ट्रेलर निर्मात्यांनी प्रदर्शित केला आहे. यात पुन्हा एकदा 4 मित्र जंगलात कॉमेडीची दंगल करताना दिसून येणार आहेत.
जुमांजी-ओपन वर्ल्ड फँटेसी अॅडव्हेंचर कॉमेडी ड्रामा फिल्मचा अखेरचा अध्याय असेल. एक अखेरचा गेम, अखेरची उलटी गणना सुरू झाली आहे असे जुमांजी फिल्म्सच्या अधिकृत एक्स हँडलवर ट्रेलर शेअर करत म्हटले गेले आहे. या ट्रेलरमध्ये ड्वेन जॉन्सन आणि त्याचे इतर तीन मित्र यावेळी जंगलात नव्या आणि अनोख्या आव्हानांचा सामना करताना दिसून येणार आहेत.
या चित्रपटात ड्वेन जॉन्सनसोबत जॅक ब्लॅक, केविन हार्ट, कॅरेन गिलान हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसून येणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक जेक काडसन यांनी केले आहे. हा चित्रपट 25 डिसेंबर रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.